सात महिन्यांमध्ये ४२ लाख दंड वसूल
By Admin | Updated: August 21, 2014 00:30 IST2014-08-20T21:47:07+5:302014-08-21T00:30:14+5:30
अवैध वाळू उत्खनन : तहसीलदारांची कारवाई

सात महिन्यांमध्ये ४२ लाख दंड वसूल
चिपळूण- तालुक्यात अवैध वाळू उत्खनन, वाळूसाठा तसेच जांभाचिरा, काळा दगड, माती उत्खनन राजरोसपणे होत होते. जांभ्या चिऱ्यावरील बंदी उठली असली तरी वाळू उत्खननावर बंदी कायम आहे. गेल्या ७ महिन्यात २३६ प्रकरणावर कारवाई करुन ४२ लाख ३७ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तालुक्यात जांभाचिरा वाहतूक व अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार वृषाली पाटील यांच्याकडे आल्या होत्या. वाळू प्रकरणी तहसीलदार पाटील यांनी कडक धोरण अवलंबले असून, त्यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. महसूल खात्याचे पथक वेळीअवेळी गस्त घालून बाहेरुन येणाऱ्या गाड्या पकडून कारवाई करत होते. उंब्रजहून मोठ्या प्रमाणावर वाळू चिपळूणमध्ये येत असते. शिवाय स्थानिक वाळू उत्खनन करणारे आपापल्या परीने कार्यरत असतात. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांचे काम सुरु असते. अशा लोकांवरही तहसीलदार पाटील यांनी धडक कारवाई केली आहे.
जानेवारी ते जुलैअखेर जांभा, चिरा, काळा दगड, माती उत्खनन करणाऱ्या १४७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २५ लाख ८७ हजार १२५ रुपये दंड आकारण्यात आला. तर जांभा व चिरा, काळा दगड, वाळू वाहतूक करणाऱ्या ८० जणांवर कारवाई करुन ७ लाख ६२ हजार ५२५ रुपये दंड करण्यात आला. ९ ठिकाणी वाळूसाठा पकडून तो जप्त करण्यात आला. त्या मालकांना ८ लाख ८७ हजार ६०० रुपये दंड करण्यात आला. एकूण महसूल खात्याने कठोर पावले उचलत ७ महिन्यात ४२ लाखाचा महसूल जमा केला आहे. ही मोहीम यापुढे अशीच सुरू राहणार आहे.
अशी झाली कारवाई
जानेवारी ते जुलैअखेर २३६ प्रकरणे दाखल.
एकूण ४२ लाख ३७ हजार २५० हजार रुपये दंडात्मक कारवाई.
जांभाचिरा, दगड, माती उत्खननाची १४७ प्रकरणे.
वाळू वाहतुकीची ८० प्रकरणे.
वाळूसाठा जप्त ९ प्रकरणे.