पक्षांतरामुळे ढवळले राजकारण

By Admin | Updated: September 28, 2014 23:58 IST2014-09-28T23:57:28+5:302014-09-28T23:58:38+5:30

सेना, राष्ट्रवादीत नाराजी : ‘आऊटगोर्इंग’, ‘इनकमिंग’चीच जोरदार चर्चा

Rebellious Politics | पक्षांतरामुळे ढवळले राजकारण

पक्षांतरामुळे ढवळले राजकारण

रत्नागिरी : महायुती व कॉँग्रेस आघाडीत घटस्थापनेच्या दिवशीच घटस्फोट झाल्यानंतर राज्यभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. रत्नागिरीही त्याला अपवाद नाही. येथे राष्ट्रवादीचे गेल्या दहा वर्षापासून आमदार व काही महिने पालकमंत्री राहिलेले उदय सामंत यांनीही शिवसेनेत प्रवेश करून सेनेच्या तिकिटावर उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेतील राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे. मात्र, सामंत यांच्या राष्ट्रवादीतून ‘आऊटगोर्इंग’मुळे व सेनेतील ‘इनकमिंग’मुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजीचा सूर आहे.
सामंत यांच्याकडे गेल्या दहा वर्षांच्या काळात जिल्हा युवक अध्यक्षपद, राज्य युवकचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले. तसेच दोन्हीवेळा त्यांच्याकहे आमदारकीही सोपविली. या काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतली व वर्षभरासाठी तब्बल नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपदही दिले. सामंत यांची राजकारणातील संपूर्ण जडणघडण राष्ट्रवादीत झाली. त्यांना असे काय कमी पडले म्हणून ते शिवसेनेत गेले? तसेच अचानकपणे सेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता विचारत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस न सोडण्याचा निर्णय घेतलेले कार्यकर्ते मात्र सामंत यांच्या निर्णयाने प्रचंड नाराज आहेत.
दुसरीकडे सामंत शिवसेनेत आल्याने सेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. त्याची प्रचिती सामंत सेनेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांतच आली. सेनेच्या बैठकीतच सामंत यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला. त्यावरून काही काळ रण माजले. मात्र, नंतर हे वादळ शमविण्यात आले. पक्षप्रमुखांचा आदेश असल्याने शिवसैनिक शांत राहिले आहेत. मात्र, ही वादळापूर्वीची शांतता नाही ना, असाही सूर आळवला जात आहे.
शिवसेनेतील कार्यकर्ते हे युती होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून स्वबळावर रत्नागिरीत निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी करीत होते. राजेंद्र महाडिक व बंड्या साळवी हे दोन इच्छुक उमेदवार होते. यापैकी पक्ष देईल त्याचा प्रचार करण्याची मानसिक तयारीही सर्व शिवसैनिकांनी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी अचानक उदय सामंत हे राष्ट्रवादीतून सेनेत आल्याने शिवसेनेत खळबळ माजली. त्यामुळे उमटलेला नाराजीचा सूर अद्याप शिवसैनिकात कायम असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसात झालेले मेळावे, मिरवणुकीला शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार लादल्याच्या चर्चेत असलेली नाराजी खरी की चेहऱ्यावर दिसणारा उत्साह खरा, याबाबतही आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरातील विविध पक्षांच्या प्रचारसभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
सामंत सेनेचे झाले...!
२६ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजता उदय सामंत सेनेत दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोरच पत्रकारांनी सामंत यांना अडचणीचे अनेक प्रश्न विचारले. जिल्ह्यात शिवसेनेचा रिमोट आता कोणाच्या हाती आहे, असे विचारता सामंत म्हणाले, शिवसेनेचा रिमोट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे तर जिल्ह्याचा रिमोट जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या हाती आहे. तालुक्याचा रिमोट बंड्या साळवी यांच्या हाती, तर रत्नागिरी शहराचा रिमोट शहरप्रमुख प्रमोद शेरे यांच्या हाती आहे, असे हजरजबाबी उत्तर दिले. त्यामुळे सामंत अवघ्या २४ तासात दुधामध्ये पिठीसाखरेच्या वेगाने मिसळल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक म्हणाले.
जाधवांपुढे आव्हान ?
आघाडी तुटल्याने गुहागरमधील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. तेथे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आता केवळ राष्ट्रवादीच्या बळावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यातच नीलेश राणे यांनी जाधव यांना दिलेले आव्हान पाहता त्यांना अधिकच सतर्कता घ्यावी लागणार आहे.

Web Title: Rebellious Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.