मान्यता नसल्याने प्रश्न

By Admin | Updated: August 11, 2014 00:13 IST2014-08-10T22:59:19+5:302014-08-11T00:13:54+5:30

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय : प्राचार्यांना देणार निवेदन

The reason for not accepting the question | मान्यता नसल्याने प्रश्न

मान्यता नसल्याने प्रश्न

रत्नागिरी : शहरात सुरू असलेल्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाची परवानगी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. आतापर्यंत केवळ आश्वासनांचीच खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत ठोस कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालयात न जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. प्राचार्यांना यासंदर्भात उद्या (दि. ११) निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावर्षी संबंधित अभ्यासक्रमाच्या चारही शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.
शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय २००९ पासून सुरू करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये गेली सहा वर्षे शैक्षणिक कामकाज सुरू आहे. मात्र, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज अद्याप अपूर्ण आहे. वास्तविक इमारत ३० जून २0१३पर्यंत पूर्ण करून ताब्यात देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या दोन-चार कामगारांच्या कामाचा आवाका लक्षात घेता बांधकाम पूर्ण होण्यास अद्याप काही वर्षे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. परंतु इमारत मात्र ‘जैसे थे’ स्थितीत आहे. इमारत पूर्ण नसल्यामुळे फार्मसी कौन्सील आॅफ इंडियाकडून महाविद्यालयाला मान्यता मिळणे अवघड असल्याने विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संबंधित महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना जर शासनाकडून वेतन दरमहा नियमित देण्यात येते, आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया होऊ शकते तर महाविद्यालय असण्याबाबत तंत्रशिक्षण विभागाला कल्पना नसणे म्हणजे हास्यास्पद आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन संबंधित प्रकाराची माहिती दिली असता त्यांनी महाविद्यालय रत्नागिरीत आहे, याबाबत माहीत नसल्याचे सांगून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री उदय सामंत, सेनेचे खासदार विनायक राऊत यांना भेटून समस्या मांडली होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन देण्यापलिकडे काहीही केलेले नाही.
अभ्यासक्रम २००९ पासून सुरू झाला. चार वर्षांचा अभ्यासक्रम रितसर पूर्ण करून दोन बॅच बाहेर पडल्या आहेत. एका बॅचमध्ये ४० विद्यार्थी आहेत. परंतु चार वर्षांचे शिक्षण पूर्ण करूनही त्यांना फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळे रितसर व्यवसाय सुरू करता येत नाहीच शिवाय शासकीय सेवेसाठीही पात्र ठरत नाहीत. केवळ दोन-तीन हजारांची नोकरी करावी लागते. आॅनलाईन प्रवेशामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खर्च करूनसुध्दा पदरी मात्र निराशा येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The reason for not accepting the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.