चौरंगी लढतीतच कळणार खरी ताकद
By Admin | Updated: September 25, 2014 23:28 IST2014-09-25T22:46:22+5:302014-09-25T23:28:10+5:30
युती फुटली, आघाडीत बिघाडी : मुख्य लढत शिवसेना-राष्ट्रवादीत होण्याची शक्यता

चौरंगी लढतीतच कळणार खरी ताकद
रत्नागिरी : महायुतीत झालेली फाटाफूट आणि आघाडीत झालेली बिघाडी यामुळे आता चौरंगी लढत निश्चित झाली आहे. जिल्ह्यात कोणत्याही मतदार संघावर कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. विद्यमान आमदारांच्या विजयात युती किंवा आघाडीचाच वाटा आहे. आता चारही पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहणार असल्याने जिल्ह्यात खरी ताकद नेमकी कोणाची आहे, हे नेमकेपणाने समोर येईल. त्यातही चार पक्ष समोर आले तरी मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच होईल, असे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांमध्ये तीन ठिकाणी युतीचे आणि दोन ठिकाणी आघाडीचे आमदार आहेत. या पाचही आमदारांच्या विजयात मित्रपक्षाचा वाटा आहे. त्यामुळे आता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.
रत्नागिरी मतदार संघ
रत्नागिरीत राष्ट्रवादीचा आमदार असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीला शिवसेनेची अंतर्गत मदत मिळत होती. आता शिवसेनाही स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याने राष्ट्रवादीला एकट्यालाच निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राष्ट्रवादीकडून उदय सामंत आणि भाजपकडून बाळ माने यांची नावे निश्चितच मानली जात आहेत. आता काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रसाद तथा बाबू पाटील आणि बंटी वणजू यांची तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि माजी तालुकाप्रमुख उदय बने यांची नावे चर्चेत आहेत.
राजापूर-लांजा मतदार संघ
शिवसेनेकडे असलेल्या या मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद तुलनेने कमी आहे. त्यामुळे येथील लढत शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशी असेल. येथे शिवसेनेकडून राजन साळवी आणि काँग्रेसकडून राजन देसाई यांचे नाव नक्की झाले आहे तर आता राष्ट्रवादीकडून अजित यशवंतराव यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघ
सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांचे नाव नक्की आहे. या तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी असली तरी लियाकत शाह आणि रश्मी कदम यांची नावे उमेदवारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकम यांना तोटा होऊ शकतो. या तालुक्यातही भाजपची ताकद कमी असल्याने मुख्य लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच होईल, हे निश्चित आहे. भाजपकडून माधव गवळी किंवा गणेश चाचे यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
गुहागर-खेड मतदार संघ
महाराष्ट्राचे कामगार मंत्री भास्कर जाधव यांनी येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडून विनय नातू यांचे नाव निश्चित आहे. गतवेळी या मतदार संघात शिवसेना-भाजपची मते फुटल्यामुळे भास्कर जाधव निवडून आले होते. आता शिवसेनेकडून रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांचे नाव चर्चेत आहे. युतीची मते फुटणार असल्याने जाधव यांना फायदा होण्याची शक्यता आहे. अर्थात यावेळी जाधव यांना काँग्रेसकडून कसलेच सहकार्य मिळणार नाही, उलट काँग्रेसकडून उमेदवार उभा राहिला तर जाधव यांची मते कमी होण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून संदीप सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
दापोली-मंडणगड मतदार संघ
येथे विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी आहेत. भाजपची ताकद कमी असली तरी ती शिवसेनेला सहाय्य करणारी आहेत. भाजपकडून येथे तालुकाध्यक्ष केदार साठे यांचे नाव चर्चेत आहे. गेली २५ वर्षे आघाडीपैकी काँग्रेसकडे हा मतदार संघ आहे. मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाही. आता काँग्रेसकडून या मतदार संघासाठी माजी जिल्हाध्यक्ष सुजित झिमण यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीनेही या मतदार संघाची मागणी केली आहे. येथे संजय कदम आणि किशोर देसाई हे राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत.(प्रतिनिधी)
उमेदवारांची शोधाशोध
ठाम विजयाचा दावा करणे कोणत्याही पक्षाला अशक्य
जिल्ह्यात तुलनेने भाजप आणि काँग्रेसची ताकद कमी
शिवसेना जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकावरचा पक्ष
शिवसेनाशी सामना करण्याची ताकद केवळ राष्ट्रवादीकडे
युती आणि आघाडी फिस्कटण्याची शक्यता कोणत्याही कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. जागा वाटपाचे वाद सुरू असले तरी ते पेल्यातील वादळ ठरतील, असे वाटत होते. पण हे वाद विकोपाला गेल्याने आता काही ठिकाणी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे.