तयार गणेशमूर्ती विक्रीला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:53+5:302021-08-29T04:30:53+5:30
गेल्या काही वर्षांपासून ‘पर्यावरणस्नेही मूर्ती’ असा उल्लेख वारंवार केला जातो. या पर्यावरणस्नेही मूर्ती म्हणजे काय? मातीच्या किंवा पीओपीच्या मूर्ती ...

तयार गणेशमूर्ती विक्रीला..
गेल्या काही वर्षांपासून ‘पर्यावरणस्नेही मूर्ती’ असा उल्लेख वारंवार केला जातो. या पर्यावरणस्नेही मूर्ती म्हणजे काय? मातीच्या किंवा पीओपीच्या मूर्ती काय अथवा पेणची मूर्ती काय? असा संभ्रम भक्तांमध्ये असतो. ८० ते ८५ टक्के भक्तांना यातील फरक कळत नाहीे. भक्तांच्या या अज्ञानाचा फायदा मूर्ती विक्रेते घेतात. कुठलीही मूर्ती स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी भक्तांना विकतात. विसर्जनावेळी कळते की, ती मूर्ती मातीची नव्हतीच. कारण, मातीची मूर्ती पाण्यात गेल्याबरोबर पाण्यातून बुडबुडे येत ती लगेच खाली जाते व मग विरघळते. पण पीओपीची मूर्ती मात्र विरघळतच नाही. ती वरच तरंगत राहते. मातीची मूर्ती वजनाला जड असते. आतून पोकळ नसते. ही मूर्ती फार चमकतही नाही. मूर्ती एकसंध नसते. ती टप्प्याटप्प्याने जोडलेली असते.
शाडू माती मूर्ती
शाडू मातीची मूर्ती ही पूर्णपणे विरघळणारी, अर्थात शास्त्रानुसार तंतोतंत विसर्जन पावणारी असते. भक्तांच्या अज्ञानाचा फायदा विक्रेते सर्वाधिक शाडू मातीबाबत घेतात. ही माती केवळ गुजरात येथील भावनगर येथून विक्रीसाठी येते. या मातीवर अप्रतिम व सुबक अशी कलाकुसर करून आकर्षक मूर्ती तयार करण्याचे काम मूर्तीकार करतात.
पीओपीमिश्रित मातीच्या मूूर्ती
पीओपीच्या मूर्ती शास्त्रापेक्षाही पर्यावरणाच्यादृष्टीने योग्य नाहीत. यावरून दरवर्षी वादंग होतो. या मूर्तींचा मुख्य बेस मातीचा असतो. पण वरील मुलामा हा पीओपीचा असतो. यामुळेच या मूर्तीही मातीप्रमाणे वजनाला जड असतात. साधारणत: चमकणाऱ्या मूर्ती या प्रकारच्या असतात. भक्तांनी घेताना त्याप्रमाणे त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. कारण या मूर्ती पूर्णपणे विसर्जित होत नाहीत.
पेणच्या मूर्तीची वेगळी ओळख
ज्याप्रमाणे प्रत्येक मूर्ती ही शाडू मातीची नसते, त्याचप्रमाणे प्रत्येक मूर्ती पेण येथील नसते. या मूर्तीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांच्यातील सुबकता. या मूर्तींचे डोळे अत्यंत रेखीव असतात. पेण येथील मूर्तीमध्ये वैविध्यता आढळते. बैठक विशिष्ट असते. एकूणच रेखीव व भक्तांना आकर्षित करणारे डोळे, हीच या मूर्तींची प्रमुख ओळख असल्याने भक्तांची या मूर्तीसाठी विशेष पसंती मिळते. गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधी या मूर्ती शहरात विक्रीसाठी येतात. काही स्थानिक मूर्तिकारांनी विक्री दालने मांडली आहेत.
नोकरी-व्यवसायानिमित्त शहरामध्ये वास्तव्य करून राहिलेल्या कुटुंबांना गणेशोत्सवात गावी जाणे अशक्य होते. अशावेळी शहरातील घरात गणेशमूर्ती आणून उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी छोट्या आकारातील, तयार गणेशमूर्ती आणल्या जातात. नोकरदार मंडळींना सुट्टी मिळत नसल्याने शक्यतो दीड दिवसांचा उत्सव मात्र भक्तिभावाने साजरा करतात.
सजावटीचे साहित्यही विक्रीला
श्री गणेश घरी येणार म्हटले की, त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्था आलीच. पाहुण्या आलेल्या देवासाठी सुंदर मखर तयार करून आकर्षक सजावट केली जाते. त्यासाठी पानाफुलांनी सुशोभित करीत असताना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. त्यामुळे सजावटीसाठी लागणारे तयार मखर, मखर तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य, पडदे, झालरी, विद्युत माळा, कृत्रिम पाने फुले, फुलांच्या माळा, पूजेचे साहित्य, गणेशासाठी लागणारी वस्त्र आदी साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.