आंबा घाटात दरड कोसळली

By Admin | Updated: June 25, 2015 01:08 IST2015-06-25T01:04:50+5:302015-06-25T01:08:21+5:30

महामार्गावरची वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प

The ravages of mangoes collapsed | आंबा घाटात दरड कोसळली

आंबा घाटात दरड कोसळली

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पवासामुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात मंगळवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प होती. आंबेड बुद्रूक येथे गोठा कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना घडली.
मुसळधार पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडत आहेत. वादळी वाऱ्यासहीत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे तर रस्त्याशेजारची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही घडत आहेत.
मंगळवारीदेखील तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा घाटातील चक्रीवळण ते गायमुख दरम्यान रात्री ८ वाजता भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली. दरडीतील मोठमोठे दगड व माती महामार्गावर पडल्यामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दरड कोसळल्याची माहिती साखरपा पोलीस दूरक्षेत्राला देताच पोलिसांनी लागलीच बांधकाम विभागाला कळवले व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना साथीला घेत जेसीबीच्या सहाय्याने ही दरड बाजूला करण्याचे काम सुरु केले.
साधारणपणे रात्री ११.३० वा. च्या सुमारास संपूर्ण दरड बाजूला करण्यात यश आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. दरम्यान दरड कोसळल्यानंतर दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दुसरीकडे पावसामुळे तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील सीताराम गोविंद गुरव यांचा गुरांचा गोठा कोसळल्यामुळे एक गाय जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानाचा गावच्या तलाठ्यानी पंचनामा केला असून त्याचा अहवाल देवरुख तहसीलदार कार्यालयात सुपूर्द केला आहे.
तालुक्यात सध्या मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मात्र शेतीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला असून बळीराजा सुखावला आहे. (वार्ताहर)

Web Title: The ravages of mangoes collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.