रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत महाराष्ट्राची कर्णधार
By Admin | Updated: October 18, 2016 23:56 IST2016-10-18T23:55:04+5:302016-10-18T23:56:01+5:30
राज्याचे खो-खो संघ जाहीर : आरती कांबळे, गौरी पवार यांचीदेखील निवड; नागपूर येथे स्पर्धा

रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत महाराष्ट्राची कर्णधार
रत्नागिरी : नागपूर येथे १९ ते २३ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत नियोजित सुवर्ण महोत्सवी (५०वी) वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंंक्यपद खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रातिनिधिक संघ जाहीर करण्यात आले आहेत. पुरूष संघाच्या कर्णधारपदी पुण्याचा प्रतीक वाईकर, तर महिला संघाची कर्णधार म्हणून रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे संघ : पुरूष संघ - प्रतीक वाईकर (कर्णधार), सुयश गरगटे, मुकेश गोसावी, मयुरेश साळुंके (सर्व पुणे), उत्तम सावंत, नरेश सावंत, सुरेश सावंत (सर्व सांगली), हर्षद हातणकर, अनिकेत पोटे, (सर्व मुंबई उपनगर), महेश शिंंदे (ठाणे), सिध्दीक भगत (मुंबई शहर), सागर कटारे (नाशिक), प्रशिक्षक ऐजाज शेख (पालघर), व्यवस्थापक डॉ. अमित राव्हटे.
महिला संघ - ऐश्वर्या सावंत (कर्णधार), आरती कांबळे, गौरी पवार (सर्व रत्नागिरी), मीनल भोईर, प्रियांका भोपी, कविता घाणेकर, मृणाल कांबळे (सर्व ठाणे), काजल भोर (पुणे), साजल पाटील, मधुरा पेडणेकर (सर्व मुंबई शहर), ॠृतुजा खरे (उस्मानाबाद), श्वेता गवळी (अहमदनगर), प्रशिक्षक पंकज चवंडे, व्यवस्थापिका नेत्रा राजेशिर्के.
गतवर्षीच्या राष्ट्रीय अजिंंक्यपद स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकवर, तर पुरूष विभागात बलाढ्य रेल्वे संघावर मात करून अजिंंक्यपद पटकावले होते. ऐश्वर्या सावंत हिच्यासह आरती कांबळे आणि गौरी पवार यांच्या निवडीमुळे रत्नागिरीच्या शीरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. (प्रतिनिधी)
महिला खो-खोसाठी शुभसंकेत
नागपूर येथील सुवर्णमहोत्सवी राष्ट्रीय अजिंंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांचा व्यावसायिक संघ सहभागी होत आहे. भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाचा संघ या स्पर्धेत खेळणार असून, त्यांचे तगडे आव्हान महाराष्ट्राच्या महिला संघाला असेल. या व्यावयायिक संघात सारिका काळे, सुप्रिया गाढवे, निकिता पवार, शीतल भोर व पौर्णिमा सकपाळ या महाराष्ट्रातील बीनीच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.