रत्नागिरीत बाजी कोणाची?
By Admin | Updated: October 19, 2014 00:25 IST2014-10-19T00:24:54+5:302014-10-19T00:25:15+5:30
रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण

रत्नागिरीत बाजी कोणाची?
रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार निवडून येणार, याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत नियोजित ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्वच ठिकाणी दुपारी १२.३0 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांत नियोजित ठिकाणी उद्या ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक ठिकाणी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक तसेच आठ राखीव कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. एकंदरीत पाच विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी ५० म्हणजे एकूण २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दापोली मतदारसंघात सर्वाधिक ३६० मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २६ फेऱ्यांमध्ये होणार आहे. गुहागर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १७ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २३ फेऱ्यांमध्ये होणार आहे. रत्नागिरीमध्ये ३४१ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २५ फेऱ्यांमध्ये होणार आहे. राजापुरात ३३२ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. पाचही ठिकाणची मतमोजणी प्रक्रिया दुपारी १२.३० वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी मतदारसंघात सर्वाधिक अकरा, तर गुहागर मतदारसंघात सर्वांत कमी पाच उमेदवार रिंगणात आहेत. चिपळूण आणि दापोली मतदारसंघात प्रत्येकी दहा, तर राजापूर मतदारसंघांत ८ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. (प्रतिनिधी)