रत्नागिरी : फळपीक परताव्याची प्रतीक्षाच
By Admin | Updated: September 23, 2014 23:56 IST2014-09-23T21:53:26+5:302014-09-23T23:56:19+5:30
विमा कंपन्यांची दिरंगाई : जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : फळपीक परताव्याची प्रतीक्षाच
रत्नागिरी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. परंतु या विमा कंपन्यांकडून अद्याप विमा परतावा जाहीर न केल्याने जिल्ह्यातील ३ हजार २८३ शेतकरी वंचित राहिले आहेत. ४०,९१४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता. परंतु विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरीवर्ग अद्याप प्रतीक्षेत असलेला दिसून येत आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या आतील अंतरावर महसूल मंडलांमध्ये ही योजना राबवण्यात आली. रत्नागिरी, पावस, खेडशी, जयगड, फणसोप, कोतवडे, मालगुंड, तरवळ, पाली या नऊ महसूल मंडलामध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेडतर्फे कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना सक्तीची करण्यात आली होती. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक होती. जिल्ह्यातील २९४८ हेक्टर आंबा क्षेत्रावरील ३,१७० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. ११,४३४ हेक्टर काजू क्षेत्रावरील ११३ लाभार्थी शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतला होता. वास्तविक यावर्षी विमा योजनेसाठी केवळ मर्यादित कालावधी देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. कृ षी अधिकाऱ्यांकडे धाव घेतलेल्या शेतकऱ्यांचेच अर्ज भरुन घेण्यात आले होते. १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर इतकाच कालावधी देण्यात आल्याने शेतकरी उपेक्षित राहिले.
फळपीक विमा संरक्षण कालावधी निर्धारित केलेल्या वेळेत अधिक तापमान, अवेळीचा अधिक पाऊस, नीच्चांकी तापमान या गोष्टींवर आधारित विमा योजना लागू करण्यात आली. हवामानावर आधारित फळपिकांवर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे उद्दिष्ट असतानासुद्धा ज्या शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला त्यांना अद्याप परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. आंब्याचा हंगाम लोटून चार महिने झाले तरीदेखील विमा कंपन्यांकडून शून्य प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये या योजनेबद्दल शंका निर्माण झाली आहे.
विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आल्याने एकूणच या विमा योजनेविषयी शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
३ हजार २८३ शेतकरी वंचित
कोकणातील आंबा बागायतदारांना हवामानाचा फटका बसतो. या हवामानामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत सापडतो. त्याला विम्याचे सुरक्षा कवच देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विमा परताव्यातच आता हा बागायतदार अडकला असून, अनेक शेतकरी वंचितच राहिले आहेत.
समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या कक्षेत ही योजना राबविली जाणार.
४१ हजार हेक्टर क्षेत्राचा काढला होता विमा.
९ महसुली मंडलात योजना केली होती कार्यान्वित.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना होती सक्तीची.
महिनाभराचाच कालावधी दिल्याने अनेक शेतकरी योजनेपासून उपेक्षित.
४ महिन्यानंतरही विमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही.
शेतकरीवर्गामध्ये योजनेबाबत शंका उपस्थित.
शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात अपयश.