रत्नागिरीत व्हिडिओ खेळघर फोडले
By Admin | Updated: January 31, 2015 00:01 IST2015-01-31T00:01:19+5:302015-01-31T00:01:34+5:30
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल : एक लाख ४२ हजार रोख रक्कम लंपास

रत्नागिरीत व्हिडिओ खेळघर फोडले
रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील भवानी व्हिडिओ खेळघर काल, गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. चोरट्यांनी शटरचे कुलूप काढून आत प्रवेश केला व कॅश काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये असलेले एक लाख ४२ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चोरट्यांनी फोडलेले हे व्हिडिओ खेळघर चिराग ठक्कर यांच्या मालकीचे आहे. ते मुंबईत राहतात. गेल्या २६ वर्षांपासून हे खेळघर ठक्कर यांनी चालवायला दिले आहे. सध्या हे खेळघर परेश देसाई (रा. रत्नागिरी) हे चालवत आहेत. या व्हिडिओघरात १२ गेम मशिन्स आहेत. काल रात्री १०.४५ वाजेपर्यंत हे खेळघर सुरू होते. या खेळघराची चावी जवळच असलेल्या एका वडापाव व्यावसायिकाकडे देण्यात येत असे. हा व्यावसायिक आपल्या दुकानातील काही साहित्य खेळघरात ठेवत असे. काल रात्रीही १०.४५ वाजता संबंधित वडापाव व्यावसायिकाने खेळघर बंद केले होते.