रत्नागिरीत पुन्हा एकदा पोटनिवडणुकीचा मांडव
By Admin | Updated: November 25, 2015 00:32 IST2015-11-25T00:18:05+5:302015-11-25T00:32:21+5:30
नगरपरिषद : प्रभाग २ मध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला!

रत्नागिरीत पुन्हा एकदा पोटनिवडणुकीचा मांडव
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या १ नोव्हेंबरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेश शेट्ये यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा सेनेचा प्रयत्न फसला होता. आता मात्र उमेश शेट्ये यांना प्रभाग दोनमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांच्याच घरच्या आखाड्यात चितपट करायचे, राजकीयदृष्ट्या धारातीर्थी पाडायचे, यासाठी शिवसेनेने धोबीपछाड देण्याची तयारी चालवली आहे. दुसरीकडे मुलगा केतन शेट्ये याला रणांगणात उतरवून आपला वॉर्ड पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी उमेश शेट्येंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या मांडवात विजयश्रीबरोबर कोणाचे राजकीय शुभमंगल होणार, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
सहा वर्षे शिवसेनेत राहून नंतर पुन्हा राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्येंमुळे रत्नागिरीत राष्ट्रवादीची ताकद पुन्हा वाढण्याची भीती सेनेतील काही दिग्गजांना वाटते आहे. त्यामुळेच १ नोव्हेंबरला झालेल्या चार जागांच्या पोटनिवडणुकीत उमेश शेट्येंना गारद करण्याची रणनीती सेना आमदार उदय सामंत व सहकाऱ्यांनी आखली होती. मात्र, ही राजकीय लढाई साधी सोपी नाही, याची पूर्ण कल्पना असल्याने उमेश शेट्ये यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली. मात्र, राष्ट्रवादीकडे असलेल्या चारही जागा पुन्हा मिळविण्यात शेट्ये यांना यश आले नाही. सेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राखली गेली.
सेनेला शेट्ये यांचे वर्चस्व मोडीत काढायचे आहे. त्यासाठीच आता प्रभाग २ची पोटनिवडणूक हा शक्तीप्रदर्शनासाठी नवीन आखाडा मिळाला आहे. राजकीय लढ्यासाठी तेल लावून तयार राहण्याचा सराव दोन्ही बाजूने सुरू आहे. २ महिन्यांपूर्वीच उमेश शेट्ये यांनी प्रभाग २ मधून राजीनामा देऊन राष्ट्रवादीतर्फे दुसऱ्या जागेवर निवडणूक लढवली व विजय संपादन केला होता. आता आपल्या जागेवर केतन शेट्ये याला उभे करून पुन्हा ही जागा ताब्यात ठेवण्याचा जोरदार प्रयत्न शेट्ये यांनी सुरू केला आहे, तर उमेश शेट्येंना धोबीपछाड द्यायचाच या हिकमतीने सेनेकडून प्रचारयंत्रणा हाताळली जाणार असल्याचे संकेत असल्याने हा सामना चांगलाच रंगणार आहे. (प्रतिनिधी)
राजकीय खल: शेट्येंचे पुत्र आमने-सामने?
प्रभाग २ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे कोणाला उतरवावे, याचा खल सध्या सुरू आहे. या वॉर्डचा राजकीय इतिहास पाहता माजी नगरसेवक राजन शेट्ये हे येथून निवडणूक लढविण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाला या प्रभागात उभे केले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दोन्ही शेट्येंचे पुत्र या निवडणुकीत आमने-सामने ठाकण्याचीही शक्यता आहे.
अस्तित्व पणाला...
उमेश शेट्ये सेनेतून राष्ट्रवादीत आले आहेत, तर आमदार उदय सामंत हे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून सेनेत आले. त्यामुळे या दोघांनाही या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत एकच जागा असल्याने ती जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे.