रत्नागिरीत भरदिवसा दहा फ्लॅट फोडले

By Admin | Updated: May 24, 2014 01:15 IST2014-05-24T01:14:24+5:302014-05-24T01:15:09+5:30

भरदिवसा धुमाकूळ

In the Ratnagiri split 10 flat flats | रत्नागिरीत भरदिवसा दहा फ्लॅट फोडले

रत्नागिरीत भरदिवसा दहा फ्लॅट फोडले

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात चोरट्यांनी आज, शुक्रवारी भरदिवसा धुमाकूळ घातला. सन्मित्रनगर व जेलरोडवरील एकूण तीन अपार्टमेंटमधील दहा फ्लॅट फोडून चोरट्यांनी किमती वस्तू लंपास केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरदिवसा चोरी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे आठ ते दहाजणांची टोळी या चोरीमागे कार्यरत असल्याचे बोलले जात असून, पोलिसांनी सायंकाळी श्वानपथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला. दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वा. दरम्यान चोरट्यांनी सन्मित्रनगरमधील अमेय अपार्टमेंटमधील चार फ्लॅटस, आशीर्वाद अपार्टमेंटमधील दोन, तर जेलरोड महाडवाला बिल्डिंगशेजारील अलसफा अपार्टमेंटमधील चार, असे एकूण दहा फ्लॅट फोडले. अमेय अपार्टमेंटमधील नमिता प्रवीण वीरकर या नोकरीनिमित्ताने बाहेर गेल्याने त्यांचा तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट बंद होता. या टेरेस रूमच्या दरवाजाची कडी कटावणीने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आतील पत्र्याच्या कपाटासह तिजोरी फोडली. त्यातील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाच हजार रुपये लंपास केले. त्यानंतर अनंत धोंडू सावंत यांचा फ्लॅट, प्रवीण नारायण लाड यांचा फ्लॅट, तसेच प्रणिता संजय मुकादम यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी कटावणीने दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला. मात्र, या फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. या अपार्टमेंटमध्ये पोलिसांचेच सात फ्लॅट आहेत. या इमारतीच्या शेजारीच असलेल्या आशीर्वाद अपार्टमेंटमधील जयवंत पाटील व सुहास साळवी यांचे दोन फ्लॅटही चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत फोडले. त्यातही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. जेलरोडवरील अलसफा अपार्टमेंटमधील काही लोक दुपारी नमाजसाठी बाहेर गेल्याने त्याचवेळी चोरट्यांनी पाळत ठेवून या अपार्टमेंटमधील चार फ्लॅट फोडले. अपार्टमेंटमधील मौजम मोहिद्दिन तांडेल (फ्लॅट नं. ८), आसिफ शौकत पावसकर (फ्लॅट नं. १३), सादिक अब्दुलगनी गडकरी (फ्लॅट नं. १४) व मेहबुबमियॉँ आदम काद्री (फ्लॅट नं. ८) यांचे फ्लॅटही चोरट्यांनी फोडले. मात्र, या फ्लॅटमधूनही चोरट्यांच्या हाती काही फारसे लागले नसल्याचे सांगण्यात आले. पोलीस रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पंचनामा करीत होते. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. अलसफामधील चोरीप्रकरणी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष इर्शाद इसहाक जांभारकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the Ratnagiri split 10 flat flats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.