रत्नागिरी : शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन
By Admin | Updated: November 6, 2014 22:06 IST2014-11-06T21:23:17+5:302014-11-06T22:06:23+5:30
स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या महत्त्वांकाक्षी कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता आणि सुशोभिकरणाची मोहीम राबवून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार आहे. या पंधरवड्याअखेर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत व्यक्त केला.
‘स्वच्छ भारत अभियाना’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. बोबडे आदींसह रेल्वे, एस. टी., नगरपालिका आदी विभागांचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही आता नित्य आणि निरंतर चालणारी लोकचळवळ बनली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था - संघटना आणि लोकांच्या सक्रीय सहभागातून हे अभियान निश्चितच यशस्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. मुळातच स्वच्छतेची मूल्ये जपणारा रत्नागिरी जिल्हा या अभियानातही आघाडीवर राहावा, यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानात स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता पंधरवड्यात पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाचा यात सहभाग अपेक्षित आहे. अस्वच्छता करणाऱ्याविरूद्ध प्रसंगी फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी होणार असून, संपूर्ण राजापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या प्रतिष्ठानचे कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन इतरही संस्था पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.
‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकामचे एस. आर. बोबडे आदींसह अन्य उपस्थित होते.