रत्नागिरी पालिकेत तिरंगी लढत अटळ

By Admin | Updated: January 3, 2016 00:59 IST2016-01-03T00:58:33+5:302016-01-03T00:59:48+5:30

राजन शेट्येंची याचिका फेटाळली : केतन शेट्ये, राजन शेट्ये, उमेश कुळकर्णी निवडणूक रिंगणात

In the Ratnagiri pool, the tri-match is inevitable | रत्नागिरी पालिकेत तिरंगी लढत अटळ

रत्नागिरी पालिकेत तिरंगी लढत अटळ

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार केतन शेट्ये यांचा अपुरी माहिती असलेला उमेदवारी अर्ज भरून घेतल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवार राजन शेट्ये यांनी घेतला होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आक्षेप घेणारी याचिका राजन शेट्ये यांनी न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे या पोटनिवडणुकीत आता तिरंगी लढत अटळ झाली आहे.
रत्नागिरी पालिकेची ही पोटनिवडणूक येत्या १० जानेवारीला होत आहे. त्यासाठी सेनेतर्फे माजी नगरसेवक राजन शेट्ये, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे केतन शेट्ये व भाजपचे उमेश कुळकर्णी हे निवडणूक रिंगणात आहेत. केवळ एका जागेसाठी होत असलेली ही निवडणूक राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, नगरसेवक उमेश शेट्ये यांनी प्रतिष्ठेची बनविली आहे, तर केतन शेट्येंचे आव्हान पेलण्याची संपूर्ण तयारी आमदार उदय सामंत यांनी केली असून, सेना नेत्यांनीही ही पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या निवडणूक प्रचारासाठी तटकरे तसेच सेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, आदी हजेरी लावणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या निवडणुकीत सेना-भाजप युती नाही. सेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभे केले असून, हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला अधिकच रंगत आली आहे. पालिकेतील २८ पैकी २७ नगरसेवकांमधील १४ संख्याबळ शिवसेनेकडे आहे. दुसऱ्या बाजूला भाजप ८, राष्ट्रवादी ४ व कॉँग्रेस १ असे १३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला सभागृहातील संख्याबळ समसमान राखण्यासाठी या जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे आमदार सामंत व त्यांचे कट्टर समर्थक राजेश सावंत हे राजन शेट्ये यांच्या विजयासाठी रत्नागिरीत ठाण मांडून आहेत. (प्रतिनिधी)
प्रचाराची धूम...
निवडणुकीला अवघा आठवडा उरला असताना सेना व राष्ट्रवादीचे उमेदवार मतदारांच्या घरी तिसऱ्यांदा पोहोचत असल्याचे चित्र आहे. भाजप उमेदवार उमेश कुळकर्णी यांच्यासाठी त्यांचा प्रचारही जोमात सुरू आहे. भाजपतर्फे गुप्तपणे प्रचारही केला जात आहे. तीनही पक्षांकडून ध्वनिक्षेपकावरून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. फोनद्वारे वारंवार मतदारांशी संपर्क साधला जात आहे. छोट्या छोट्या कोपरा सभांनाही जोर आला आहे.
करविषयक भरणाही अपूर्ण
राष्ट्रवादीचे उमेदवार केतन शेट्ये यांनी संपत्तीविषयक अपुरी माहिती उमेदवारी अर्जात दिली आहे. तसेच करविषयक भरणाही अपूर्ण असल्याचा दावा करीत हा अर्ज स्वीकारणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात राजन शेट्ये यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निकाल काय लागणार याबाबत शहरवासीयांत तर्कवितर्क लढविले जात होते; मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत न्यायालयाने राजन शेट्ये यांची याचिका फेटाळल्याने तिरंगी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Web Title: In the Ratnagiri pool, the tri-match is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.