रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे - पाटीलवाडी येथे विनापरवाना व गैरकायदा गावठी हातभट्टीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात ३ लाख २३ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा नाश करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल, शुक्रवारी करण्यात आली.उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्यासह शहर पोलिस स्थानक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि क्यु. आर. टी पथकाने संयुक्तपणे छापा मारला.पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात एक २४ वर्षीय तरुण गावठी हातभट्टीची दारु गाळत असताना सापडला. तसेच दारुभट्टीसाठी लागणारे साहित्य व ४० लिटर गावठी दारु, २०० लिटर क्षमतेचे ६० बॅरल, १२,००० लिटर रसायन असे एकूण ३ लाख २३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आला. तसेच गावठी हातभट्टीचा अड्डाही उदध्वस्त करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात विनापरवाना व गैरकायदा गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या गावठी हातभट्टीबाबत माहिती मिळाल्यास ८२६३८८३३१९ वर कळवावे. - धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.