रत्नागिरी नगरपालिका सभेला सत्ताधारीच गैरहजर
By Admin | Updated: July 29, 2014 00:01 IST2014-07-28T23:41:00+5:302014-07-29T00:01:55+5:30
मयेकर यांनी सभा केली रद्द : सामंत-महायुती वाद पुन्हा रंगणार; रस्त्याच्या कामांचा विषय असल्याने अघोषित बहिष्कार

रत्नागिरी नगरपालिका सभेला सत्ताधारीच गैरहजर
रत्नागिरी : नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखालील रत्नागिरी पालिकेच्या पहिल्याच विशेष सभेला आज, सोमवारी सत्ताधारी युतीचे नगरसेवकच गैरहजर होते. २१ कोटींच्या रस्ते डांबरीकरण कामावरून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उदय सामंत व पालिकेतील सत्ताधारी महायुती यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळेच आजची पालिका बैठक रद्द झाल्याचे स्पष्ट झाले.
नगराध्यक्ष निवडीपूर्वी (२४ जुलै) प्रशासकांनी लावलेल्या या सभेच्या विषयपत्रिकेद्वारे शहरातील २१ कोटींच्या डांबरीकरण कामांचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, त्यातील काही कामे कार्य आदेश (वर्कआॅर्डर) देण्यापूर्वीच झालेली असताना त्यांचा या कामांच्या यादीत समावेश आहे. त्याबाबतचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी करूनही न मिळाल्याने ही विशेष सभा रद्द करण्यात आली. काही नगरसेवकांनी आज रजा टाकली होती. आम्हाला विकास हवा आहे; परंतु केवळ घोषणा नको. विकासकामांचा निधी पालिकेच्या खात्यात जमा झाला, तर आम्ही मान्य करू, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले.
आज सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या सभेवर सत्ताधारी सेना-भाजपच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. सभेला हे नगरसेवक अनुपस्थित होते, तरी प्रत्यक्षात नगरपालिकेच्या आवारात ते दिसून येत होते. आजच्या पालिका सभेला नगराध्यक्षांसह दहा सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सेनेचे उमेश शेट्ये, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर, बाळू साळवी, प्रीती सुर्वे, स्मितल पावसकर, अभिजित गोडबोले, सईद पावसकर, मुनीज जमादार, कॉँग्रेसच्या नगरसेविका मुनज्जा वस्ता यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
मुख्याधिकारी आहेत कुठे?
आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी आपल्याशी साधा संवादही साधलेला नाही. त्यावरून त्यांची कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे. याप्रकारे काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडून शहर विकासाबाबत काय अपेक्षा ठेवणार? मुख्याधिकारी आहेत कुठे, असा सवाल माझ्यासह सर्व नगरसेवकांचा आहे, असे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर म्हणाले.