रत्नागिरी - कोल्हापूर रस्ता चकाचक

By Admin | Updated: March 31, 2015 00:26 IST2015-03-30T21:42:42+5:302015-03-31T00:26:51+5:30

अनेक महिन्यांची मागणी पूर्ण : रस्ता पक्का झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढतोय

Ratnagiri - Kolhapur road Chakachak | रत्नागिरी - कोल्हापूर रस्ता चकाचक

रत्नागिरी - कोल्हापूर रस्ता चकाचक

जाकादेवी : रत्नागिरी - कोल्हापूर रस्त्यावरच्या वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने यापूर्वी रडतकढत जाणारी सर्व प्रकारची वाहने आता वेगाने धावू लागली आहेत. त्यामुळे चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खराब असतो. तसा गेल्या पावसाळ्यातही हा रस्ता खाचखळग्यांनी भरला होता. रत्नागिरी ते कोल्हापूर या मार्गावरील बराचसा रस्ता डांबरीकरणाने पूर्ण करण्यात येत आहे.रत्नागिरी - कोल्हापूर हा सुमारे १३५ किलोमीटरचा प्रवास आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून जाणारा व अनेक ठिकाणी वळणे असणारा हा मार्ग. अरुंद नाही व म्हणायला रुंदही नसलेला पण निसर्गसौंदर्याने नटलेला हा रस्ता. उन्हाळ्यातील काही दिवस सोडले तर नेहमी अल्हाददायक वाटणारा नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे.पश्चिमी घाटातील पावसामुळे हा रस्ता नेहमीच खराब होतो. खाचखळगे निर्माण होऊन वाहनधारकांना त्रासदायक ठरतो. गेल्या पावसाळ्यात या रस्त्याची दैना झाली होती. वाहनधारक शासनकर्त्यांना व रस्ते करणाऱ्यांना दूषणे देत होती. या रस्त्यावरुन जाता-येता पुढे जाण्यासाठी व जागा देण्यासाठी कधी कधी चालकांचे वादही होत.
आता मात्र डांबरीकरण झाल्याने या गोष्टींना थारा नाही. रत्नागिरी साखरपा, मुर्शी, घाटातील आंबा ते दख्खन तसेच कोल्हापूर ते बोरपाडवे दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आले आहे. मधला काही किमीचा भाग डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, बराच रस्ता डांबरीकरण झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या मार्गावरील डांबरिकरणामुळे आता वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात असून, परिसरातील वर्दळ वाढली आहे. (वार्ताहर)

Web Title: Ratnagiri - Kolhapur road Chakachak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.