रत्नागिरी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
By Admin | Updated: August 22, 2014 22:07 IST2014-08-22T21:40:56+5:302014-08-22T22:07:06+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष

रत्नागिरी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
रत्नागिरी : पर्यावरण संरक्षण व्हावे, याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंंदे, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. एस. बोबडे, सार्वजनिक बांधकाम विभाग, दक्षिण रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता ए. व्ही. कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मंडळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा घेऊन शहरी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट मंडळांना गौरवण्यात येईल. शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करणारी मंडळे, पर्यावरण जागृती करणारी मंडळे, गुलाल, मद्यपान, फटाका, डी. जे.चा वापरविरहीत मिरवणूक अशा विविध उपक्रम राबविणाऱ्या आणि प्रदूषणविरहीत गणपती मंडळांना प्रशासनाकडून गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि मंडळांनीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. गणेशोत्सव काळात वाळू वाहतुकीला बंदी असल्याने या कालावधीत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, असेही ते म्हणाले. गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या मदत केंद्राचे काम पूर्ण करावे. तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. याठिकाणी क्रेन आणि १०८ क्रमांकाची अत्याधुनिक रुग्णवाहिका पूर्णवेळ उपलब्ध करावी. महावितरणने गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. तसेच विसर्जन घाटावरील दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक संस्थांनी उपाययोजना करावी, अशा सूचना त्यांनी केली. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी घातले लक्ष
कोकण रेल्वेने जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवर गाड्या थांबवण्याची वेळ वाढवावी. स्थानकांसाठी स्वतंत्र डबे ठेवतानाच प्रवाशांची चढ-उतार शिस्तबद्ध पद्धतीने होईल, याकडे लक्ष द्यावे. रेल्वे स्थानकावरील सुरक्षेसाठी आरपीएफच्या जवानांना आवश्यकता भासल्यास पोलीस बळ उपलब्ध करुन देण्यात यावे. महामार्गासह जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच महामार्गाला पर्याय ठरणाऱ्या मार्गांच्या मजबुतीकरणाकडे विशेष लक्ष द्यावे. कुंभार्ली घाट, आंबा घाटात संरक्षक कठड्यांवर रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी विशेष सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संबंधित विभागाला यावेळी दिली.