रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तिसरे
By Admin | Updated: June 20, 2014 00:18 IST2014-06-20T00:18:40+5:302014-06-20T00:18:40+5:30
मुलीचा जन्मदर : जिल्ह्यात हजारी ४७ ने झाली वाढ

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तिसरे
रत्नागिरी : जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात मुलींच्या जननदरात गतवर्षीच्या तुलनेत हजारी ४७ ने वाढ झाली आहे. २०१२-१३ मध्ये मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत मुलींचे जन्मदर प्रमाण हजारी ९२३ होते. राज्यातील जिल्हा रुग्णालयातील २०१३-१४ च्या मुले-मुली जननदरात रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा तिसरा क्रमांक आला आहे. राज्यात अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील मुलींचा जननदर हा राज्यातील प्रथम तर वर्धा जिल्हा रुग्णालयातील मुलींचा जननदर हा द्वितीय क्रमांकाचा आहे. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे यांनी दिली.
गेल्या काही वर्षात राज्यातील जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, शिक्षण देणारी रुग्णालये व महिला रुग्णालयांमधील मुलींच्या जननदराची आकडेवारी संकलित केली जात आहे. त्यावरून मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्मप्रमाण काय आहे, याचा शासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात असून या जननदरात अधिक फरक राहणार नाही याकडे शासन जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. अनेक ठिकाणी मुलगी म्हणजे कर्जाचा बोजा तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा गैरसमज अद्यापही दृढ असल्याने सोनोग्राफी करून मुलीचा गर्भ असल्यास तिला गर्भातच मारले जाण्याचे अर्थात भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले होते.
शासनाने सोनोग्राफीबाबतचे नियम अत्यंत कठोर करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्याचे दृश्य परिणाम आता दिस ूलागले आहेत. त्याचबरोबर मुलांप्रमाणे मुलगीही वंशाचा दिवा असल्याबाबत पथनाट्य व अन्य मार्गांनी प्रबोधन केले जात आहे. त्याचा परिणामही समाजात दिसून येत आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयानेही यामध्ये उत्तम कामगिरी केल्याचे नारोळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)