रत्नागिरी : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी अखेरपर्यंत ० ते १८ वयोगटातील विविध अवघड आजार असलेल्या ३३९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे या बालकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण झाला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १ एप्रिल २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांच्या आजारांवर मोफत उपचार होतातच, पण आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जातात.
काही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात होतात. काही आजारांचे तज्ज्ञ रत्नागिरीत या शस्त्रक्रियांसाठी येतात. मात्र, काही शस्त्रक्रियांसाठी या मुलांना मोठ्या शहरांमध्ये पाठविले जाते. अशा वेळी हा सर्व खर्च आरबीएसकेमार्फत केला जातो. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत आरबीएसकेमार्फत विविध आजारांच्या ३३९ बालकांवर अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या.सर्वाधिक २५ शस्त्रक्रिया हृदयासंदर्भात असून, ३१४ इतर शस्त्रक्रिया आहेत. यामध्ये हाडांच्या, अंडकोषासंदर्भात, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, जन्मत:च व्यंग, मोतीबिंदू किंवा डोळ्यांमधील दोष, दंत शस्त्रक्रिया, दुभंगलेले ओठ व टाळू अशा अनेक अवघड शस्त्रक्रियांचा समावेश आहे. बालकांवर लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने सामान्य कुटुंबाला दिलासा मिळत आहे.
विविध आजारांवरील शस्त्रक्रियाआजार - पात्र - झालेल्या शस्त्रक्रियाहृदयविकार - ३० - २५हाडांच्या - ११ - ११हर्निया - ३४ - ३४अपेंडिक्स - ५४ - ५४दंत - १३ - १३ईएनटी - ३९ - ३९दुभंगलेले ओठ - ५ - ५अन्य - १५३ - १५३एकूण - ३४४ - ३३९
३० मुले हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली. त्यापैकी २ मुलांच्या पालकांची तयारी नसल्याने शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर तिघांवरील शस्त्रक्रिया प्रस्तावित आहेत.