रत्नागिरी जिल्ह्यात रिपाई लढणार स्वतंत्र...!
By Admin | Updated: September 25, 2014 23:30 IST2014-09-25T22:25:26+5:302014-09-25T23:30:34+5:30
जे. पी. जाधव : महायुतीमधील संघर्षामुळे कार्यकर्ते नाराज

रत्नागिरी जिल्ह्यात रिपाई लढणार स्वतंत्र...!
देवरुख : सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरुन चाललेला प्रचंड गोंधळ अद्यापही कायम असून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला मिळत असलेली वागणूक पहाता रिपाईचे पक्ष नेतृत्वासह कार्यकर्तेदेखील नाराज झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करीत जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा आपण स्वतंत्रपणे स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव व कोकण प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी देवरुख येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आणि नऊ तालुकाध्यक्षांची मते जाणून घेतल्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
यावेळी कोकण कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पक्ष प्रवक्ते अनंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष अ. वि. जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रितम रुके, जिल्हा युवाध्यक्ष आदेश मर्चंडे, युवा सरचिटणीस संदीप कदम, कोषाध्यक्ष मिलींद तांबे उपस्थित होते. तसेच रत्नागिरी तालुकाध्यक्ष तु. गो. सावंत, लांजाचे वि. धा. जाधव, राजापूरचे राजन बेतकर, संगमेश्वरचे वाय. जी. पवार, गुहागरचे महेंद्र कदम, खेडचे शंकर तांबे, दापोलीचे अजीत तांबे, मंडणगडचे भरत यादव यांच्याबरोबरचख देवरुखचे रा. ना. जाधव, कृ ष्णा कदम उपस्थित होते.
यावेळी पाचही जागा लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव यांनी स्पष्ट करीत उमेदवारांची घोषणाही केली. त्यामध्ये राजापूर मतदार संघातून राजन बेतकर, वि. धा. जाधव, रत्नागिरीतून रजत पवार, तु. गो. सावंत, चिपळूणमधून अ. वि. जाधव, वाय. जी. पवार, गुहागरमधून अनंत पवार, विजय असगोलकर तर दापोलीमधून अजित तांबे, आदेश मर्चंडे यांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पुढे बोलताना कोकण कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे म्हणाले की, सध्याची युतीमधील शिवसेना आणि भाजप यांची भूमिका लक्षात घेता चर्चा लांबवायची आणि रिपाई त्या गाफील ठेवायचे आणि मग त्यांना युतीमधील पर्यायावाचून निर्णयच राहणार नाही, अशी त्यांची अवस्था करायची, असे चित्र स्पष्ट होत आहे.
रिपाईला सन्मानपूर्वक वागणूकही महायुतीकडून दिली जात नसल्याचा आरोप करीत केवळ स्थानिक पातळीवरील जिल्हा पातळीवरील नेत्यांनी - कार्यकर्त्यांनी आपल्याला अद्यापही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शविली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेवटी बोलताना कासारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व धोक्यात येवू नये म्हणूनच पक्षाची ताकद काय आहे, ते निवडणुकीनंतर महायुतीला कळेलच. एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, युती होण्याची शक्यता आता मावळली आहे. मात्र तरीही युती झाल्यास पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसारच पुढील रणनिती ठरविली जाईल आणि पाचही जागा स्वबळावरच लढविण्याची तयारी आपण पक्षाच्यावतीने केल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (प्रतिनिधी)