रत्नागिरी : शासनाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कामाचा सुमारे ७६ टक्के भाग पूर्ण झाला असून, निपुण महाराष्ट्र उपक्रमात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे.तसेच या उपक्रमात बुलढाणा दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या क्रमांकावर जळगाव, चाैथ्या क्रमांकावर धुळे आणि पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा आहे.इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन केले जाणार आहे. आतापर्यंत शेकडो शाळांची तपासणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून समजते. पूर्वी खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासली जात असे. मात्र, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यांकन अचूक आणि निष्पक्ष व्हावे यासाठी या कार्यक्रमात एआय आधारित ॲपचा वापर केला जात आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती किंवा अधोगती वैयक्तिक पातळीवर तपासली जाते.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, मागील दहा ते बारा दिवसांत शाळांमधील विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन कौशल्य तपासण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एआय प्रणाली शाबासकीची थाप देत कौतुक करते. तर अप्रगत विद्यार्थ्यांना लेखन, वाचन पुन्हा सराव करण्याचा संदेश पाठवते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकतेनुसार कमी-जास्त मार्गदर्शनही मिळते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जात आहे. शिक्षकांनी या उपक्रमासाठी प्रतिसाद द्यावा. याची मुदत २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे याची यंत्रणेने नोंद घ्यावी. - किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी.