रत्नागिरी : आघाडीत बिघाडी, युतीला लाभदायी
By Admin | Updated: September 25, 2014 00:23 IST2014-09-24T22:39:29+5:302014-09-25T00:23:41+5:30
विधानसभा निवडणूक : कार्यकर्त्यांचा धीर खचण्याचीच भीती जास्त

रत्नागिरी : आघाडीत बिघाडी, युतीला लाभदायी
रत्नागिरी : आघाडीतील जागावाटपाचे अडलेले घोडे, एवढेच नव्हे तर त्यावरील चर्चा टोकाला पोहोचल्याने आघाडीत बिघाडी होण्याची भीती वाढली असून, आघाडीत बिघाडी झाल्यास त्याचा फार मोठा परिणाम दोन्ही पक्षांच्या यशावर होऊ शकतो, असे म्हणावे लागेल. जिल्ह्यात शिवसेना-भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आताच बाळसं धरलेल्या आघाडीतील दोन्ही पक्षांना भुईसपाट व्हावे लागण्याचीच शक्यता जास्त आहे.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली तरी आघाडीत अजूनही एकवाक्यता नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळवलेल्या निर्भेळ यशामुळे काँग्रेस कार्यकर्ता खचला आहे. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादीमध्येही अस्वस्थता वाढली आहे आणि त्यातच वरिष्ठ नेते आता आघाडीसाठीही प्रयत्न करताना दिसत नसल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणखीनच वाढणार आहे. मध्यंतरीच्या काही दिवसात दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेले पक्षांतर पाहता या निवडणुकीत अशा घडामोडी आणखीन वेग घेण्याची शक्यता अधिक दिसत आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी नेते आघाडीत बिघाडी करण्याच्या दृष्टीनेच जास्त प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असल्याने कार्यकर्त्यांमधील मरगळ आणि अस्वस्थता आणखीन वाढण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
आघाडी तुटली तर...?
दोघांचे भांडण अन्...
राजापूर -लांजा-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे म्हणावे तेवढे वर्चस्व नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी नाही झाली तरीही शिवसेनेला काही फरक पडणार नाही. उलट बिघाडी झालीच तर शिवसेनेला आणखीन मोठा विजय मिळण्याचीच शक्यता जास्त आहे.
राष्ट्रवादीला किंमत मोजावी लागणार
गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडी तुटल्यास राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना किंमत मोजावी लागणार आहे. आधीच त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या नीलेश राणे यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आघाडी तुटली तर अख्खी काँग्रेस त्यांच्याविरोधात जाऊ शकते.
महायुतीसाठी मार्ग मोकळा
चिपळूण मतदारसंघात महायुतीसाठी आघाडी तुटणे म्हणजे यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. राष्ट्रवादीसाठी यापूर्वी जरी नुकसानीचे वातावरण असले तरीही मागील काही महिन्यात राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले आहे. मात्र, आघाडी दुभंगली तर राष्ट्रवादीच्या ताकदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब
रत्नागिरी मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी ती मोठी चिंतेची बाब ठरू शकते. कारण काँग्रेसची मते कमी असली तरी मागील निवडणुकीत निसटत्या मतांनी राष्ट्रवादीचा झालेला विजय पाहता यावेळी ती निर्णायक ठरू शकतात.
सेनेला फायदाच
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व आहे. त्यामुळे आघाडी जुळली किंवा बिघडली, शिवसेनेसाठी ती ‘बडी खबर’ ठरेल, असे आजपर्यंतचे वातावरण नाही. फक्त आघाडी तुटली तर सेनेचे मताधिक्य आणखीन वाढू शकते आणि ही बाब आघाडीसाठी निराशाजनक आहे.