रत्नागिरी ५९७ साकव मोडकळीस
By Admin | Updated: August 18, 2014 23:29 IST2014-08-18T22:48:14+5:302014-08-18T23:29:49+5:30
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

रत्नागिरी ५९७ साकव मोडकळीस
रहिम दलाल- रत्नागिरी --जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५९७ साकव मोडकळीस आले आहेत. या साकवांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेले वर्षभर धूळखात पडून आहे, तर या साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे अद्याप निधीची तरतूदच नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावरुन ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या साकवांची स्थिती दयनीय झाली असून, ते मोडकळीस आले आहेत. हे साकव मोडकळीला आल्याने धोकादायक स्थितीत असल्याने त्यावरुन जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ ये-जा करतात.
वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीला आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडे मागविले होते. जिल्हाभरातून ५९७ साकवांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी आले होते.
या साकवांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ६ लाख ७८ हजार रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार केला होता. मात्र, जिल्हा परिषदेकडे साकवांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल, २०१३ मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता.
वर्ष उलटले तरी हा दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धूळखात पडून आहे. त्याबाबत त्यांना जिल्हा परिषदेकडे वारंवार या दुरुस्तीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याला अजिबात प्रतिसाद देण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यातील साकव दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव ग्रामविकास खाते आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यामुळे आता तरी या साकवांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.