बचत गटांना रेशन दुकान
By Admin | Updated: August 21, 2014 00:26 IST2014-08-20T21:41:12+5:302014-08-21T00:26:39+5:30
पुरवठा विभाग : ७२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरीे

बचत गटांना रेशन दुकान
रत्नागिरी : जिल्ह्यातील नव्या ६५ रेशनदुकानांसाठी बचत गटांकडून आलेल्या ७२ प्रस्तावांपैकी १६ प्रस्तावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. आवश्यक साधनसामुग्री, भांडवल आदींची पूर्तता बचत गटांनी केल्यानंतर ही दुकाने सुरू होणार आहेत.
जिल्ह्यात ८९४ रास्तदर धान्य दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७९३ दुकाने कार्यरत आहेत. उर्वरित १४३ दुकाने अद्याप रिक्त आहेत. यापैकी ४२ दुकाने तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यास देण्यात आली असून, १०१ दुकाने अद्याप रिक्त आहेत. यापैकी पुरवठा विभागाकडून ६५ रेशन दुकाने बचत गटांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. या ६५ दुकानांसाठी ७२ प्रस्ताव आले आहेत. त्यांची छाननी करून १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. गतवर्षी बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी रेशनदुकाने महिला बचत गटांना चालवण्यास देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्याला महिला बचत गटांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, यावर्षी पुरूष आणि महिला बचत गटांकडून प्रस्ताव आले आहेत.
रेशनदुकानांसाठी आवश्यक ती कागदपत्र आणि भांडवली खर्चाबरोबर त्या गावातील महिला ग्रामसभेच्या मंजुरीची आवश्यकता अनिवार्य केली आहे. या १६ बचत गटांना महिला ग्रामसभेत मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांचे प्रस्ताव पुरवठा विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे बचत गटांना देण्यात येणाऱ्या ६५ दुकानांपैकी १६ दुुकाने लवकरच सुरू होणार आहेत. उर्वरित ४९ दुकानांसाठीच्या प्रस्तावांनाही त्या त्या गावच्या महिला ग्रामसभेच्या मान्यतेनंतर पुरवठा विभागाची मंजुरी मिळणार आहे. या महिनाअखेरीस हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांनी दिली. खेड तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात २, दापोलीत ४, गुहागरमध्ये ३ आणि संगमेश्वर तालुक्यात एक अशी १६ दुकाने आता बचत गटांकडून चालविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)