रंगोबा साबळे रस्ता दुरुस्ती आज मार्गी लागणार?

By Admin | Updated: December 11, 2014 00:00 IST2014-12-10T21:26:20+5:302014-12-11T00:00:55+5:30

चिपळूण पालिका : काम तत्काळ करण्यासाठी नगराध्यक्षांनी दिले पत्र...

Rangoba Saal road repair today will be needed? | रंगोबा साबळे रस्ता दुरुस्ती आज मार्गी लागणार?

रंगोबा साबळे रस्ता दुरुस्ती आज मार्गी लागणार?

चिपळूण : बॅ. नाथ पै चौक ते भाजी मंडईदरम्यान रंगोबा साबळे रस्त्यावरील गटाराचे काम उद्या (गुरुवारी) केले जाणार आहे. येथे नागरिकांनी विरोध केल्यास अडचण नको म्हणून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे, तर वाहतूक बंद करण्यासाठी एस. टी. महामंडळाला कळविण्यात आले आहे. हे काम तत्काळ व्हावे, यासाठी आज (बुधवारी) येथील नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
रंगोबा साबळे रस्त्यावर एका हॉटेलसमोर सांडपाणी रस्त्यावरुन जात असल्याने मोठा खड्डा पडला आहे. येथील गटार चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.
मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन येथे महिला पडली आणि पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला. रिक्षाचालक संघटनेचे दिलीप खेतले, रवींद्र घाडगे, राजू भोसले, अकलाक शिरगावकर, दादा लकेश्री, अशोक गांधी, संजय कदम, समीर गांधी, श्रीकांत नटे, प्रदीप नलावडे, मंदार मोरे, दत्ताराम उदेग, मुराद दुसेणी, खाटीकआळी येथील फैसल पिलपिले, इम्रान कुरेशी, शौकत कुरेशी, सुभाष खेरटकर, जुल्फिकार शेख, युनूस मेमन, मुदस्सर तांबे, अफजल मेमन आदींनी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यानंतर येथील प्रश्न चर्चेत आला. हा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. येथील नागरिकांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने रात्री तातडीने घटनास्थळी जाऊन काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथे पुरेसा प्रकाश नव्हता. शिवाय स्थानिक ग्रामस्थांनी गटारात पाणी सोडण्यास मज्जाव केला. म्हणून मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर नगराध्यक्षांशी चर्चा करुन कर्मचारी काम न करताच परतले.
आज (बुधवारी) नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांनी मुख्याधिकाऱ्यांना काम तातडीने सुरु करावे व लोकांची गैरसोय दूर करावी. अन्यथा होणाऱ्या जनप्रक्षोभास आपण जबाबदार राहाल, अशा आशयाचे पत्र दिले.
त्यानुसार तातडीने काम करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. बांधकाम विभागाने एस. टी. महामंडळ व पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे. स्थानिक नागरिक गटारात पाणी सोडण्यास विरोध करीत असल्याने गरज पडल्यास पोलीस संरक्षणात काम करावे, असे यापूर्वीच ठरले आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात काम करण्याची तयारी नगर परिषदेने केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडणार? याकडे परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच प्रतिसाद दिला असता तर हे काम मार्गी लागले असते. या मार्गावरील खड्ड्यामुळे व घाणीच्या सांडपाण्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. शिवाय लहान मोठे अपघातही होत आहेत. पालिकेने याबाबत वेळीच पावले उचलली नाहीत, तर या भागातील रिक्षाचालक व नागरिक तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

Web Title: Rangoba Saal road repair today will be needed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.