कोरोनाबाबत खबरदारी घेत रमजान ईद साधेपणाने साजरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST2021-05-13T04:32:07+5:302021-05-13T04:32:07+5:30
रत्नागिरी : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता रमजान ईद अत्यंत साधेपणाने ...

कोरोनाबाबत खबरदारी घेत रमजान ईद साधेपणाने साजरी करावी
रत्नागिरी : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यावर्षी १३ एप्रिलपासून मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. दि. १३ किंवा १४ मे रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाच्या आदेशानुसार विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ईदकरिता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाजपठण, तरावीह तसेच ईफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ' ब्रेक द चेन' आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाजपठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईदनिमित्ताने महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून, त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्यावेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
राज्यात जमावबंदी तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईदनिमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी, असे प्रशासनाने कळवले आहे.
रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घ्यावी तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.