दापाेलीत वृक्षाला राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:19+5:302021-08-23T04:33:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापाेली : भावाने नेहमी आपली रक्षा करावी म्हणून बहीण भावाला राखी बांधत असते. अशाचप्रकारे वृक्षही मनुष्याचे ...

दापाेलीत वृक्षाला राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापाेली : भावाने नेहमी आपली रक्षा करावी म्हणून बहीण भावाला राखी बांधत असते. अशाचप्रकारे वृक्षही मनुष्याचे रक्षण करतात म्हणून वृक्षांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
सध्या ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड व वनसंवर्धन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर दापोली सायकलिंग क्लबतर्फे आझाद मैदान दापोली - पोस्टाची गल्ली - कोकंबा आळी - समर्थ नगर - गोसावीवाडी गिम्हवणे - राणेवाडी - भौंजाळी शिवाजीनगर - माता रमाई स्मारक - पद्मावती मंदिर वणंद - आझाद मैदान या मार्गावर सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी वृक्षांचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात आले. या मार्गावर आवळा, जांभूळ, चिंच, असाणा, जारुळ, अमलतास, गुलमोहर, कोकम, सोनचाफा आदी जातीच्या सुमारे १०० वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणाचाही संदेश देण्यात आला. ही झाडांची रोपे दापाेली वन विभाग व जालगाव येथील नरेंद्र बर्वे यांनी उपलब्ध करुन दिली हाेती. तसेच अनेक सायकलप्रेमींनी बिया जमवून सीडबॉल व रोपे तयार केली होती. अनिल काते यांनी सेंद्रिय खताची गोणी दिली.
आझाद मैदानातील झाडांना ओवाळून, राखी बांधून सायकल फेरीची सुरूवात करण्यात आली. बांधकाम सभापती केदार परांजपे, निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे, सरपंच, वाडीप्रमुख, सदस्य रोशन मंडपे, बाळकृष्ण बामणे, मनीष मंडपे, हरिश्चंद्र धोत्रे, विजय धोत्रे, दत्ताराम कुंबेटे, संतोष भुवड, आप्पा राणे, पमा सावंत, अविनाश गुजर, नीलेश राऊत, कीर्ती परांजपे, सुयोग घाग, प्रितेश कर्लेकर यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, संजय मांजरे, सुनील रिसबूड, अंबरीश गुरव, संदीप भाटकर, उत्तम पाटील, केतन पालवणकर यांनी केले हाेते.
-------------------------------
८१ वर्षांचे नागरिकही सहभागी
या सायकल फेरीत काहीजण आपले कुटुंब, मुले, नातू यांच्यासोबत सहभागी झाले होते. यामध्ये लहान सायकलस्वार ५ वर्षाचा नील झगडे, ६ वर्षाची काव्या परांजपे सहभागी झाले हाेते. तर ८१ वर्षांचे विजय गोळेही सहभागी झाले होते. यापैकी अनेकजण आरोग्य तंदुरुस्तीसाठी, बाजारात व कामावर ये-जा करण्यासाठी या मार्गावर सायकल चालवत असतात. वृक्षारोपण केलेल्या नवीन रोपांचा सांभाळ व देखभाल करण्याची जबाबदारी येथील सायकलप्रेमींनी घेतली आहे.