रक्षाबंधन..... गोड बंधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:09+5:302021-08-22T04:34:09+5:30
बहीण-भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण अर्थात रक्षाबंधन! भारतीय संस्कृतीमध्ये भैय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने साजरा ...

रक्षाबंधन..... गोड बंधन!
बहीण-भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण अर्थात रक्षाबंधन! भारतीय संस्कृतीमध्ये भैय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने साजरा करण्यात येतो. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावासाठी दीर्घायुष्य व सुख लाभो, मिळो म्हणून प्रार्थना करतात. भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. वास्तविक एकमेकांना जोडणारा असा हा सण आहे. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते, असा समाज सामर्थ्यशाली बनतो हा संदेशही राखी पौर्णिमेद्वारे दिला जाऊ शकतो.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठविलेले राखीचे ताट असो वा श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठविलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय, या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावा-बहिणींचे परस्परांवरील प्रेम. स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली, तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून सुचवत असते. यात तिचा दुबळेपणा नसून, भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ, बहीण असोत किंवा मानलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनच राखी पौर्णिमा साजरी केली जात असावी. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री ही चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. इंटरनेट, मोबाईल किंवा स्मार्टफोनमुळे जग कितीही जवळ आले असले तरी परगावी राहणाऱ्या भावाला पोस्टाने किंवा कुरिअरने आवर्जून राखी पाठविली जाते.
काळानुरूप रक्षाबंधनाचा सण केवळ कुटुंबीयांपुरता मर्यादित राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमीही झाडांना राख्या बांधून त्यांच्या ‘जतन व संवर्धनाचा’ संदेश देतात. तसेच शाळांमधून मोठ्या प्रमाणावर राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांनाही पाठविल्या जातात. काही कुटुंबीय किंवा मित्र परिवार कारागृह, मनोरुग्णालय, तसेच बालसुधारगृहे, निरीक्षणगृहे, अनाथाश्रमात जाऊन तेथील मंडळीना राख्या बांधतात. एकूणच ‘सामाजिक बांधीलकी’ जपण्याचे काम केले जाते. काही शाळांतील विद्यार्थिनी पोलीस बांधवांनाही राख्या बांधून सण साजरा करतात.
प्रत्येकाची आवड ही निरनिराळी असते. बाजारात सध्या विविध प्रकारच्या राख्या विक्रीस उपलब्ध आहेत. शहरात राख्यांनी नटली आहेत. काही दुकानदारांनी तर राख्यांचे दालनच उघडले आहे. युवती, महिलांची राख्यांसाठी गर्दी होत असलेली दिसून येते.
ग्रामदैवतचं पोवतं
घरोघरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येत असला तरी ग्रामदेवतेला राखीपौर्णिमेला पोवतं बांधलं जातं. पुजारी पोवती तयार करून ग्रामदेवतेला बांधतात. त्यानंतर घरोघरी ही पोवती वाटण्यात येतात. पुरुष मंडळी पोेवतं हातात बांधतात किंवा गळ्यात घालतात. ग्रामदेवतेला रक्षाबंधनादिवशी पोवतं अर्पण केल्यानंतर हा सण साजरा करण्यात येतो. आजही घरात अधिकच्या राख्या खरेदी करण्यात येतात. त्यातील एक राखी घरातील देव्हाऱ्यात ठेवण्याची प्रथा आहे. नंतरच घरातील मंडळींना राखी बांधली जाते.