राज्यराणी, जनशताब्दीला जादा डबे द्या

By Admin | Updated: March 19, 2015 00:01 IST2015-03-18T22:23:31+5:302015-03-19T00:01:16+5:30

सुरेश प्रभू यांचे आदेश : विनायक राऊत यांची मंत्र्यांकडे मागणी

Rajkani, Janshatabdi get additional coaches | राज्यराणी, जनशताब्दीला जादा डबे द्या

राज्यराणी, जनशताब्दीला जादा डबे द्या

कुडाळ : कोकण रेल्वेच्या मार्गावरील राज्यराणी व जनशताब्दी या दोन महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनातून केली. या दोन्ही गाड्यांना तत्काळ जादा डबे जोडण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या राज्यराणी व जनशताब्दी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या कोकणातील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मात्र, या दोन्ही गाड्यांना कमी डबे असल्याने जास्तीत जास्त लोकांना या गाडीमधून प्रवास करता येत नव्हता. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या, वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता राज्यराणी व जनशताब्दीला जादा डबे जोडण्याची मागणी कोकणवासीय अनेक वर्षे करीत आहेत. ही मागणी आता पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)

सुरेश प्रभू यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
कोकणवासीयांच्या या मागणीचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केला. यासंदर्भात खासदार राऊत यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना निवेदन दिले होते. कोकणवासीयांसाठी महत्त्वपूर्ण मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही मागणी पूर्ण करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने राज्यराणी व जनशताब्दी एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिल्याचे खासदार राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Rajkani, Janshatabdi get additional coaches