राजीवलीचा कार्यालय प्रस्ताव रखडलेलाच
By Admin | Updated: December 25, 2015 00:01 IST2015-12-24T21:51:55+5:302015-12-25T00:01:57+5:30
जिल्हाधिकारी यांची भेट : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना

राजीवलीचा कार्यालय प्रस्ताव रखडलेलाच
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी, राजीवली व रातांबी या तीन गावची मिळून एकच राजीवली ग्रुप ग्रामपंचायत तयार करण्यात आली. या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास अद्याप झालेला नाही. येथील नागरी सुविधांबद्दल तर प्रशासनाने ग्रामस्थांची उपेक्षाच केली आहे. राजीवली ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण ९ वाड्या आहेत. येथे ७५० पेक्षा जास्त मतदार आहेत. या परिसरात अद्याप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकास निधी खर्च करण्यात आलेला नाही. प्रकल्पग्रस्त भाग असल्याने येथे नागरी सुविधा पुरविण्याचे दायित्व हे पुनर्वसन विभाग तसेच पाटबंधारे विभागांतर्गत येते. मात्र, या विभागांकडून विकासात्मक अशी कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत. या ग्रामपंचायत हद्दीत दोन शासकीय पुनर्वसन गावठाणे आहेत तर आठ खासगी गावठाणे आहेत. खासगी गावठाणामध्ये शासनाच्या इतर विभागांचा निधी खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्पग्रस्त भाग असा या परिसराला शिक्का बसल्याने संपूर्ण परिसराचा विकास खुंटला आहे. राजीवलीग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध नाही. या कार्यालयाचे दफ्तर हे शिर्केवाडीतील समाज मंदिरात ठेवण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ही याच समाज मंदिरातून होतात. तीन गावचा गाडा हा ग्रामपंचायत इमारतीअभावी हाकला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे. राजीवली ग्रामपंचायत क्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या धरणाच्या दोन खोऱ्यात विखुरले गेल्याने ग्रामपंचायत कार्यालय नक्की कुठे असावे याबाबत स्थानिकांमध्ये मतभेद आहेत. येडगेवाडी, घाडगेवाडी, राजीवली बौध्दवाडी, रातांबी व काळंबेवाडी या वाड्यांनी ग्रामपंचायत कार्यालय तीन गावांच्या मध्यभागी असावे, असे मत ग्रामसभेत मांडले तर ग्रामपंचायत कार्यालय शिर्केवाडी गावठाणातून हलवू नये यासाठी शिर्केवाडी हट्ट करत आहे. या वादात नवीन इमारत कुठे उभारावी, असा प्रश्न पडला आहे. सध्या तीनही गावचे मिळून एकच ग्रामपंचायत कार्यालय आहे. पण हे ग्रामपंचायत कार्यालय कुठे असावे, शिर्केवाडी, राजीवली की काळंबेवाडी या संघर्षाला कंटाळून कुटगिरी येडगेवाडी हे स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीला अधिक जोर आला आहे. राजीवली ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या कुटगिरी गावाला स्वतंत्र महसूल गाव म्हणून प्रथमपासून दर्जा आहे. या गावची लोकसंख्या ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीच्या कक्षेत येते. तरीही स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्ताव रखडलेला आहे. राजीवली शिर्केवाडी यांच्या हट्टामुळे ग्रामपंचायत इमारत बांधणीचा प्रस्तावदेखील रखडला आहे. याबाबत काही वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दि. १९ रोजी गडनदी प्रकल्पाला पर्यायाने येडगेवाडीला भेट दिली व येडगेवाडीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. कुटगिरी हा महसूल गाव असल्याने ७००पेक्षा जास्त मागासवर्गीय वस्ती असलेल्या येडगेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करुन द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (प्रतिनिधी)
येडगेवाडी ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करावी. आवश्यकतेनुसार या प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही शिफारस केली जाईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या या आश्वासनाचा यापुढे आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करुन येडगेवाडीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तुकाराम येडगे, आत्माराम येडगे, अनंत येडगे, सुरेश येडगे यांनी सांगितले.