राजापुरात चक्क एका तलाठी सजाची चोरी

By Admin | Updated: June 26, 2014 00:22 IST2014-06-26T00:19:49+5:302014-06-26T00:22:17+5:30

ग्रामस्थांमध्ये संभ्रम

Rajapura, a thief of a Talathi prison | राजापुरात चक्क एका तलाठी सजाची चोरी

राजापुरात चक्क एका तलाठी सजाची चोरी

पाचल : सोने चोरीला जाते, रोख पैसे चोरीला जातात, हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण राजापूर तालुक्यात चक्क एक तलाठी सजा चोरीला गेला आहे. पाचल मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात येणारा करक तलाठी सजा चक्क चोरीला गेली आहे. एका रात्रीत या कार्यालयाचे दप्तर एका गावातून दुसऱ्या गावात हलवण्यात आले. मात्र, तहसील कार्यालयात याबाबतची कुठलीही लेखी नोंद नाही. विशेष म्हणजे या सजाकडून देण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रांवर करक सजा असाच शिक्का मारला जात आहे.
महसूल खात्याने करक, पांगरीखुर्द, तळवडे, गुरववाडी अशा चार गावांसाठी मिळून करक सजाची निर्मिती केली. यापूर्वी या सजाचे काम करक येथूनच सुरु होते. मात्र, मध्यंतरी एका रात्रीत हे कार्यालय करक येथून अन्य ठिकाणी हलवण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
याबाबत करकच्या सरपंच भामिनी सुतार यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर करुन हे कार्यालय करक येथून कधी हलवण्यात आले याची माहिती मागवली. या पत्राच्या उत्तरादाखल तहसील कार्यालयाकडून चार महिन्यांनी उत्तर मिळाले. दप्तर कधी हलवण्यात आले, याबाबत कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तहसील कार्यालयाने कळवले. या उत्तराने चक्क सरंपच सुतारही क्षणभ अवाक झाल्या.
हे कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाले असले तरी या कार्यालयाचा कारभार जुन्याच ठिकाणच्या शिक्यावरून चालतो आणि याबाबत तहसीलदार या तालुक्याच्या मुख्यालयाला कोणतीच माहिती नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राजापूर तहसिल यंत्रणेच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या सजाचा शिक्का करक सजा असाच आहे. पण कार्यालय गावात नाही. मग करक सजा करकमध्ये आहे कुठे? चक्क सजाच चोरीला गेली नाही ना ? असा गमतीदार प्रश्न राजापूर तालुक्यात केला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Rajapura, a thief of a Talathi prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.