राजापुरात काही वेळातच लसीकरण बंद केल्याने गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:46+5:302021-05-11T04:33:46+5:30
राजापूर : राजापूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दुपारनंतर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी शहरातील नागरिकांनी मोठी ...

राजापुरात काही वेळातच लसीकरण बंद केल्याने गाेंधळ
राजापूर :
राजापूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दुपारनंतर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, काही वेळातच लसीकरण बंद करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. शेकडो ज्येष्ठ नागरिकांना लसीशिवाय परतावे लागल्याने रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष अजिम जैतापकर यांनी केली आहे.
राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुपारी २ वाजल्यापासून लसीकरण करण्यात येणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही वेळातच शेकडो राजापूरकरांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली. सुमारे ३०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात जमा झाले. त्यांना पुरेसा लसीचा साठा उपलब्ध असल्याचे समजले. मात्र संध्याकाळी ५ वाजता लसीकरण पोर्टल बंद करण्यात आले.
त्यामुळे दुपारपासून उन्हातान्हात उभ्या राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांना नाराज होऊन माघारी परतावे लागले. अचानक लसीकरण बंद करण्यात आल्याने लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. जर ५ वाजता पोर्टल बंद होत असेल, तर तोपर्यंत किती व्यक्तींना लसीकरण करता येईल, याचा अंदाज घेऊन इतर लोकांना अगोदरच कल्पना दिली असती, तर ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण ताटकळत राहून नाराज होऊन घरी परतावे लागले नसते, असे जैतापकर यांनी सांगितले़