राजन साळवी यांना जनतेचा एकमुखी कौल

By Admin | Updated: October 19, 2014 22:59 IST2014-10-19T22:38:17+5:302014-10-19T22:59:32+5:30

र्व सात उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षाही अधिक आहेत

Rajan Salvi is united in the masses | राजन साळवी यांना जनतेचा एकमुखी कौल

राजन साळवी यांना जनतेचा एकमुखी कौल

विनोद पवार - राजापूर --राज्यात तुटलेली युती व फुटलेली आघाडी यामुळे राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदार संघात कमी झालेले मतदान पाहता कोणाला फायदा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, आज मतमोजणीच्या वेळी या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने एकमुखी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून साळवी यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली होती. १ लाख ४३ हजार ७७ इतके मतदान झाले होते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७६ हजार २६६ मते शिवसेनेचे राजन साळवी यांनी मिळवत आपले प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राजन देसाई यांच्यावर ३९ हजार १३९ मतांची आघाडी मिळवत विजय संपादन केला आहे. येथील मतदारांनी एकतर्फी राजन साळवी यांच्या पारड्यात मते टाकल्यामुळे काँग्रेसवगळता अन्य सर्वच उमेदवारांची अनामतही जप्त होणार आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रथम टपाली मतदानाची मोजणी हाती घेण्यात आली होती. अगदी तेव्हापासून राजन साळवी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत कायम राहिली. प्रचारात कोणत्याही प्रकारचा गवागवा न करता, किंंवा एकही जाहीर सभा न घेता पहिल्यापासूनच शिवसेनेची छुपी प्रचार पध्दती राबवली होती. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा विचार करता यावेळी राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे मताधिक्य चांगलेच वाढलेले दिसून येते. काँग्रेसने राजन देसार्इंसारखा स्वच्छ चेहरा उमेदवार म्हणून दिलेला असतानादेखील त्याचा फायदा काँग्रेसला उठवता आलेला नाही. विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची चांगलीच पिछाडी झाल्याचे पाहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळची पडलेली ५५ हजार मतेही या निवडणुकीमध्ये काँग्रेसला टिकवता आलेली नाहीत. उलट यामध्ये पिछाडीवर येत राजन देसाई यांना ३७ हजार २०७ मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांनी मिळवलेली मते ही इतर सर्व सात उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षाही अधिक आहेत. चौरंगी लढत होईल, असे मानले जात असतानाच प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी दुरंगी लढत दिसून आली. काँग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात स्वतंत्रपणे उतरल्यामुळे राष्ट्रवादी किती मते घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. यामुळे काँग्रेसला तोटा सहन करावा लागेल, असे मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार अजित यशवंतराव यांना ११ हजार ९२३ मते मिळाली, तर संघ परिवार, ब्राह्मणवर्ग, गुजराती व बौध्द मतांच्या जोरावर आपले नशीब आजमावणाऱ्या भाजपाच्या संजय यादवराव यांनी ९ हजार ९५३ मते मिळवली. फक्त भाजपाच्या पारड्यात एकच गोष्ट दिलासादायक ठरली ती म्हणजे मतदारसंघातील सर्वच ३३२ बुथवर भाजपाने शुन्याचा भोपळा फोडण्यात यश मिळवले. यापलिकडे भाजपचे कोणतेही कर्तृत्व या मतदारसंघातून दिसून आले नाही. आजपर्यंत एकदाही या मतदार संघात निवडणूक न लढवलेल्या भाजपाने आपले अस्तित्व दाखवले, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
शिवसेनेचे राजन साळवी यांनी मिळवलेल्या आघाडीला त्यांनी गेल्या ८ ते १० वर्षांत मतदार संघात राहून घराघरात निर्माण केलेली आत्मियताच कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. तसेच गेल्या अनेक वर्षात राजन साळवी यांनी आरोग्याच्या बाबतीत आपली स्वत:ची निर्माण केलेली यंत्रणा सर्वांत प्रभावी ठरली आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर जास्त राहिला आहे. कोणत्याही ठिकाणचा पेशंट सिव्हील हॉस्पिटलला गेल्यनंतर त्याला त्याठिकाणी त्यांच्या माणसांनी केलेली मदत राजन साळवींच्या पाठीशी दुवा बनून राहिल्याचे या निवडणुकीत दिसून आले. साळवी यांचा विजय त्यामुळेच सुकर झाल्याचे सध्या राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे.
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील मतदारांनी नोटाचा वापर केल्याचे दिसून आले. मतदारसंघातील १९३५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याने नोटा पाचव्या स्थानी दिसून आला. हिंंदू महासभेच्या प्रमिला भारती यांना १८२५, बहुजन मुक्ती मोर्चाचे रमेश पाजवे यांना ८९५, तर अपक्ष गणपत जाधव यांना ७५३ मते मिळाली. त्यामुळे हे उमेदवार नोटापेक्षाही मगे राहिल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना समाधानकारक विकासकामे न करतादेखील शिवसेनेच्या राजन साळवी यांनी निव्वळ वैयक्तिक पातळीवर निर्माण केलेले संबंधच त्यांच्या मदतीला आल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. केवळ आपल्या सुखदुखात सहभागी होणारा आमदारच आपल्याला हवा असल्याचे मतदारांनी या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. मतदारसंघासाठी कोणताही वेगळा विकासाचा मुद्दा समोर न ठेवतादेखील हा गड शिवसेनेने अबाधित राखण्यात यश मिळवले आहे.

Web Title: Rajan Salvi is united in the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.