राजन कापडींचा रामराम
By Admin | Updated: January 20, 2015 23:50 IST2015-01-20T23:18:14+5:302015-01-20T23:50:19+5:30
भूमिकेकडे लक्ष : राष्ट्रवादीच्या उपजिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सादर

राजन कापडींचा रामराम
आरवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती राजन कापडी यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर कापडी यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.कापडी हे पूर्वी शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जायचे. शिवसेनेत असताना तीनवेळा जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती, पक्षप्रतोद, उपजिल्हाप्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. गुहागर मतदार संघात युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने त्यांना काढून टाकले. त्यानंतर मधल्या काळात शांत राहिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांचे सहकार्य नसल्यामुळे आपण नाराज असल्याचे त्यांनी सुतोवाच केले होते. कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत आपल्याला फारसे महत्त्व दिले जात नसल्याने, आपण जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिला असल्याचे कापडी यांनी सांगितले.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात समर्थकांचा मेळावा घेऊन, पुढील राजकीय भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. सत्तेत राहून कोणी संधी दिली, त्यामधून कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्याची भूमिका जो पक्ष घेईल, त्या पक्षाशी आपण सहमत राहू, असे कापडी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सध्या तरी वरिष्ठ पातळीवर चर्चा घडून आल्यास कापडी हे स्वगृही जातील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कापडी यांना शिवसेनेत परत घेण्यास स्थानिक पातळीवरुन काहीसा विरोध असला, तरी त्यांच्या प्रवेशाला वरिष्ठ पातळीवरुन हिरवा कंदील असल्याची चर्चा आहे. राजन कापडी यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
जुने पदाधिकारी स्वीकारतील?
शिवसेनेतून काढून टाकल्यानंतर राजन कापडी यांनी राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला. त्यांनी राष्ट्रवादीचाही राजीनामा दिल्याने ते पुन्हा शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा सुरू असली, तरीही शिवसेनेत गेल्यानंतर जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना स्वीकारणार का? याबाबत राजकीय गोटात संभ्रमाचे वातावरण आहे.