पावसामुळे भात उत्पादनात होणार घट
By Admin | Updated: July 28, 2015 00:28 IST2015-07-27T22:11:56+5:302015-07-28T00:28:44+5:30
वाढ खुंटली : जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण

पावसामुळे भात उत्पादनात होणार घट
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी यावर्षी कमी पावसामुळे भाताच्या उत्पादनात किमान १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भात लागवडीचे समाधान मिळाले असले तरी भाताची प्रत्यक्ष वाढ खुंटली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, दुय्यम शेती नागलीची केली जाते. पावसावर अवलंबून असलेली भातशेती लागवड प्रक्रिया यावर्षी पावसाअभावी रखडली आहे. पाणथळ तसेच पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रातील भात लागवड प्राधान्याने पूर्ण करण्यात आली तरी डोंगराळ भागातील शेती लागवडीस मात्र विलंब झाला. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४४ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. नागली पिकाची १४ हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत असली तरी अद्याप ४ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड पूर्ण झाली आहे.
जुलै महिना संपला तरी लागवडीची कामे अद्याप प्रलंबित आहेत. शिवाय लागवडीसाठी विलंब झाल्यामुळे भातरोपांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अजूनही म्हणावा तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. उन्हामुळे रोपे पिवळट पडली आहेत. शिवाय भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे फुटवे अद्याप चांगल्या प्रकारे झालेले नाहीत. फुटवेच झाले नसल्यामुळे पुढे भाताच्या लोंबीवर त्याचा परिणाम होणार आहे.
भाताची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ भात लागवडीचे समाधान लाभत आहे. त्यामुळे यावर्षी भाताची उत्पादकता घटण्याचे संकेत दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)