गुहागरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST2021-09-08T04:38:34+5:302021-09-08T04:38:34+5:30
गुहागर : तालुक्याला मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात तब्बल १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वच ठिकाणी ...

गुहागरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
गुहागर : तालुक्याला मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात तब्बल १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पालशेतसह आरे, नवानगर या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद झाली हाेती.
तालुक्यात गुहागरात १३५ मिलिमीटर, पाटपन्हाळे १७० मिलिमीटर, आबलोली १९० मिलिमीटर, तळवली १४५ मिलिमीटर, हेदवी १७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुहागर एसटी स्टँडसमोर सायंकाळपर्यंत पाणी भरले होते. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक जण बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी आले होते. मात्र, पावसामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. शृंगारतळी बाजारपेठेतही पाणी भरल्याने हीच स्थिती पाहायला मिळाली हाेती. तालुक्यातील पालशेत, आरे, नवानगर या पुलावरून पाणी गेल्याने काही तास वाहतूक बंद झाली होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी कमी होऊन पाणी ओसरल्यानंतर या पुलावरील वाहतूक पूर्ववत झाली.