पाऊस रुसला...!
By Admin | Updated: July 1, 2014 00:27 IST2014-07-01T00:26:24+5:302014-07-01T00:27:09+5:30
अकरा वर्षात यंदा गाठला नीचांक रत्नागिरीतील स्थिती

पाऊस रुसला...!
रत्नागिरी : पावसाने यावर्षी पाठ फिरवली असून, गेल्या अकरा वर्षातील जून महिन्यात पडलेल्या पावसापेक्षा यावर्षी जून महिन्यात पडलेला पाऊस हा सर्वात कमी आहे. गेल्या अकरा वर्षात गतवर्षी २०१३ साली जूनमध्ये पडलेला पाऊस सर्वाधिक होता.
दरवर्षी ७ जूनला पडणारा पाऊस यावर्षी मात्र, अजूनही गायबच आहे. तुरळक सरी वगळता म्हणावा तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. त्यामुळे पावसाची सगळीच नक्षत्र कोरडी यंदा जातात की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भरपेट पाणी पुरवणारी पावसाची हुकमी नक्षत्र कोरडी गेल्याने आता शेतकऱ्याकडे वाट पाहण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.
पावसावर विसंबून पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पेरण्याही झालेल्या आहेत. मात्र, पाऊसच गायब झाल्याने पुढील कामे रखडली आहेत. उन्हाचाही कडाका वाढल्याने आता पाऊस या एक दोन दिवसात पडला नाही तर रोपे सुकण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्क्त केली जात आहे.
जाणकारांच्या मते जूनमध्ये पाऊस पडला नाही तरी जुलैमध्ये जोरदार पडेल. मात्र, सध्या पावसाबद्दल कुठलेच भाकीत करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या ११ वर्षात प्रत्येक वर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेने या वर्षीच्या जून महिन्यात पडलेला पाऊस सर्वात कमी (सरासरी २९७.३७ मिलीमीटर )आहे.
जून २०१३ मध्ये सर्वाधिक (सरासरी १३४८ मिलीमीटर) पावसाची नोंद आहे. हा जून महिना कोरडा गेला असला तरी आता एक दोन दिवसात पाऊस सुरू होण्याचे संकेत मिळत असले तरी उकाडाही तेवढाच असह्य झाला आहे. त्यामुळे पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. पाऊस गायब झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)