कडवई स्थानकात ‘रेलरोको’
By Admin | Updated: January 16, 2016 00:33 IST2016-01-15T23:13:58+5:302016-01-16T00:33:33+5:30
संगमेश्वर तालुका : रेल्वेस्थानक मंजूर, पण बांधकाम रखडले

कडवई स्थानकात ‘रेलरोको’
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील मंजूर रेल्वे स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात व्हावी, या मागणीसाठी कडवई रेल्वेस्थानक संघर्ष समितीच्यावतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली कडवई कुंभारवाडी येथे रेल रोको करण्यात आले. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांपुढे हतबल होत अखेर रेल्वे प्रशासनाला मांडवी एक्स्प्रेस काही काळ कडवई येथे थांबवावी लागली. या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देत तीन आठवड्यांची मुदत घेण्यात आली. या कालावधीत लवकरात लवकर स्थानक बांधकामाच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.कडवई रेल्वेस्थानक व्हावे, या मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली. याची दखल घेत वर्षभरापूर्वी कडवई स्थानकाला मंजुरी देण्यात आली. मात्र, बांधकामाला विलंब होत होता. यासाठी ग्रामस्थांच्यावतीने १५ जानेवारीला रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता.शुक्रवारी सकाळपासूनच कडवई परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी १२.३०च्या दरम्यान कडवई - कुंभारवाडी येथील प्रस्तावित रेल्वेस्थानकाजवळ ग्रामस्थ जमले होते. मांडवी एक्स्प्रेसच्या वेळेत ग्रामस्थांनी आपला मोर्चा रेल्वे रुळाकडे वळवला. ट्रॅकवर उतरण्यापूर्वी पोलिसांनी हा मोर्चा ट्रॅकजवळ अडवला. मात्र, ग्रामस्थांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन या मार्गावरून जाणारी मांडवी एक्स्प्रेस काही काळ थांबवण्यात आली.यानंतर रेल्वे प्रशासनाच्यावतीने सहाय्यक प्रबंधक टी. मंजुनाथ, संगमेश्वर पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा केली. यात कडवई रेल्वेस्थानक निर्मितीचा प्रस्ताव कोकण रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी ८ आॅक्टोबर २०१५ला पाठवण्यात आला असून, ग्रामस्थांची आक्रमकता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्यावतीने येत्या पंधरा दिवसात विशेष प्रयत्न केले जातील. लवकरच कोकण रेल्वे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक यांच्यासोबत ग्रामस्थांची सभा घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, या कालावधीत ठोस कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे थांबविली जाईल, असा इशारा जितेंद्र चव्हाण यांनी दिला. या आंदोलनात रिक्षा मालक - चालक संघटना, कडवई - तुरळ - चिखलीच्या सर्व सभासदांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे हे जितेंद्र चव्हाण यांच्यासोबत आंदोलनाचे नेतृत्व करत होते. यावेळी कडवई, तुरळ, चिखली, रांगव, मासरंग, शेजवडे, लांबेडी आदी गावातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता. तालुकाध्यक्ष अजित ताठरे, राजवाडी सरपंच नंदकुमार मांजरेकर, सदानंद ब्रीद, दत्ताराम ओकटे, बावा मयेकर, अशोक उजगावकर, मारुती किंजळकर, सुरेश कोतळुकर, कृष्णा येलोंडे, संतोष भडवलकर, सीताराम बाईत उपस्थित होते. (वार्ताहर)
आधी दुर्लक्ष : आंदोलनानंतर रेल्वे प्रशासन नमले
कडवई येथे रेल्वे स्थानकाचे काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी याहीपूर्वी दिला होता. मात्र, त्याबाबत रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले. रेल्वे बोर्ड जर दुर्लक्ष करणार असेल, तर ग्रामस्थ आक्रमक होतील, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांची अनेक आंदोलने.
वर्षभरापूर्वी कडवई स्थानकाला मंजुरी.
शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त.
मनसेचा इशारा
कडवई येथे रेल्वे स्थानक मंजूर आहे, पण त्याच्या कामासाठी एवढा काळ जात असेल तर ग्रामस्थ यापुढे आक्रमक धोरण अवलंबतील, असा इशारा मनसेच्यावतीने जितेंद्र चव्हाण यांनी यावेळी दिला आहे.