मार्गताह्मणेत गावठी हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:44+5:302021-05-11T04:33:44+5:30
लाखोंचा मुद्देमाल जप्त : तिघांना अटक; भट्ट्याही केल्या उद्ध्वस्त लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील मार्गताह्माणे येथील गावठी हातभट्टीवर ...

मार्गताह्मणेत गावठी हातभट्टीवर धाड
लाखोंचा मुद्देमाल जप्त : तिघांना अटक; भट्ट्याही केल्या उद्ध्वस्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील मार्गताह्माणे येथील गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने छापा टाकत सुमारे एक लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे, तर हातभट्ट्यांना थेट आग लावून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. रविवारी ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील मार्गताह्माणे येथे बेकायदा गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होती. माहितीची सत्यता पडताळल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी संबंधित ठिकाणी थेट छापा टाकून कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत तब्बल एक लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सुधीर घाणेकर, संदीप घाणेकर आणि गणेश घारे (सर्व मार्गताह्माणे) या तिघांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत तसेच हातभट्टीचे सर्व साहित्य जागेवरच आग लावून उद्ध्वस्त करण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली असून, स्थानिक गुन्हा अनवेशन पथकाने थेट ही कारवाई केल्याने बेकायदा गावठी हातभट्टी दारुवाल्यांचे धाबेच दणाणले आहेत. मार्गताह्माणेत यापूर्वीही उत्पादन शुल्क विभागाने अशीच मोठी कारवाई केली होती. तसेच चिपळूण वालोपे येथेही काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती.