रत्नागिरीत कॉग्रेस भवनात राडा

By Admin | Updated: May 12, 2014 00:15 IST2014-05-12T00:15:15+5:302014-05-12T00:15:15+5:30

रत्नागिरी : राणे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस भवनमध्येच

Rada in the Ratnagiri Congress House | रत्नागिरीत कॉग्रेस भवनात राडा

रत्नागिरीत कॉग्रेस भवनात राडा

रत्नागिरी : राणे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस भवनमध्येच यथेच्छ धुलाई केली. त्यांना खुर्च्या फेकून मारल्या. यात सुर्वे यांचे कपडेही फाटले. मात्र, याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. लोकसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असताना रत्नागिरीत आज (शनिवार) भर दुपारी कॉँग्रेस भवनमध्ये हा राजकीय राडा झाला आहे. नीलेश राणे यांच्या प्रचार नियोजनासाठीची आघाडीच्या समन्वय समितीची बैठक सुरू असतानाच दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर व अन्य पदाधिकार्‍यांबरोबरच राष्टÑवादीचे मंत्री उदय सामंत व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. १४ एप्रिलला उद्योगमंत्री नारायण राणे यांची खंडाळा येथे प्रचार बैठक घेण्यासाठी विवेक सुर्वे यांचा आग्रह सुरू होता. ही बैठक एका पंचायत गणाची न घेता तीन गणांची घेऊ, असे मत पालकमंत्री समर्थकांनी मांडले. त्याला विवेक सुर्वे यांनी विरोध दर्शविला व आपण गर्दी जमवू, असे सांगितले. त्यावरून वादावादी सुरू झाली. आधीच राष्टÑवादी व सुर्वे यांच्यात वाद आहे. त्या रागातून सुर्वे पालकमंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे पालकमंत्री समर्थक कार्यकर्त्यांनी सुर्वे यांना कॉँग्रेस भवनाच्या आतच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये सुर्वे यांच्या अंगावरील शर्टही फाटला. जमिनीवर पडलेल्या सुर्वे यांनी पालकमंत्री सामंत यांच्या पायाला मिठी मारत ‘मला वाचवा’ असा टाहो फोडला. पालकमंत्री सामंत यांनी सुर्वे यांची मारहाण टाळण्यासाठी त्यांना कॉँग्रेस भवनच्या बाहेर नेल्याने सुर्वे यांची सुटका झाली. तोपर्यंत घटनास्थळी पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सुर्वे यांना मारहाण सुरू केली. त्यामुळे सुर्वे आपली गाडी तिथेच टाकून पळून गेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, या प्रकाराबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही किंवा त्याबाबत पोलीस तक्रारही दाखल झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Rada in the Ratnagiri Congress House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.