रत्नागिरी शहरात कडेकोट बंदोबस्त
By Admin | Updated: October 12, 2014 00:45 IST2014-10-12T00:45:12+5:302014-10-12T00:45:12+5:30
पंतप्रधानांची सभा : रत्नागिरीतील चंपक मैदानावर तयारीला वेग, औत्सुक्य वाढले

रत्नागिरी शहरात कडेकोट बंदोबस्त
रत्नागिरी : भाजपा उमेदवार बाळ माने यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रत्नागिरीच्या चंपक मैदानावर १३ आॅक्टोबरला सकाळी ११.०० वाजता होणार आहे. या सभेसाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असून मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राखीव दलाच्या तुकड्यांसह खास कमांडोजही रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे चंपक मैदान परिसराला पोलिस छावणीचे रुप आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या ५ जागा असून सर्वच जागांवर भाजपानेही यावेळी आपले उमेदवार उभे केले आहेत. युती तुटल्यानंतर सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. मात्र युती तुटल्यानंतर जिल्ह्यात पूर्वी मित्र असलेल्या सेना व भाजपातच जोरदार सामना होत आहे. रत्नागिरीत माजी मंत्री असलेल्या उदय सामंत यांच्याबरोबर भाजपाचे उमेदवार बाळ माने यांचा सामना होत आहे. भाजपाने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची बनविली आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांची प्रचारसभा रत्नागिरीत होत आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पंतप्रधानांची सभा होणार असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलिस तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारीही रत्नागिरीत दाखल झाले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून चंपक मैदान व परिसरात पोलिसांची करडी नजर आहे. मैदानाच्या परिसरातच पोलिसांच्या अनेक चौक्या बनविण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरात असलेल्या या मैदानावर याआधीही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. ५० हजार ते लाखाच्या दरम्याने या सभेला उपस्थिती असेल, असा दावा भाजपा नेत्यांनी केल्याने व मोठा शामियाना उभारला गेल्याने येथे येणाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणेकडून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले जात आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे उद्घाटनानंतर
यापूर्वी कोकण रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्याला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुषमा स्वराज या रत्नागिरीत आल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान रत्नागिरीत येणार असल्याने त्यांच्याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता असल्याचे दिसून येते.
४मोदींच्या आगमनामुळे भाजपा कार्यकर्त्यांत चैतन्य.
४केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांची प्रचारसभा.
४जिल्हा पोलिस तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारीही रत्नागिरीत दाखल.
४लाखभर लोक उपस्थित राहतील, असा अंदाज.
४सुरक्षा यंत्रेणेचे डोळ्यात तेल घालून ल
क्ष.