विद्यार्थ्यांनी बनवली रेसिंग कार
By Admin | Updated: February 19, 2015 23:40 IST2015-02-19T23:06:21+5:302015-02-19T23:40:16+5:30
माने महाविद्यालय : इंडियन कार्ट रेसिंग स्पर्धेत १९वा क्रमांक

विद्यार्थ्यांनी बनवली रेसिंग कार
देवरुख : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आॅटोमोबाईल व मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम फॉर्म्युला रेसिंग कार व गो कार्टची निर्मिती केली आहे. या पहिल्या रेसिंग कारने तामिळनाडू येथे झालेल्या इंडियन कार्ट रेसिंग स्पर्धेत १९ वा क्रमांक पटकावला आहे.फॉर्म्युला डिझाईन कॉम्पिटीशन (एफडीसी) २०१५ व इंडियन कार्ट रेसिंग (आयसीआर) २०१५ या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही स्पर्धा करी रोड स्पीड वे, कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत फॉर्म्युला रेसिंगसाठी भारतातून ४४ व गो कार्ट रेसिंगसाठी ७९ अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी झाली होती. त्यामध्ये आयआयटी, मुंबई, के. जे. सोमय्या मुंंबई, मणिपाल युनिव्हर्सिटी, व्हीआयटी वेल्लोरे यांसारख्या अग्रमानांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश होता.स्पर्धेसाठी फॉर्म्युला स्टुडंट्स आॅफ जर्मनी (एफएसजी) चे सदस्य परीक्षक म्हणून आले होते. फॉर्म्युला रेसिंग या स्पर्धेत महाविद्यालयाचा विसावा तसेच गो कार्ट रेसिंगमध्ये १९ वा क्रमांक आला. या स्पर्धेमध्ये १७८ संघांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यामधून ४४ संघांची निवड झाली, तर अंतिम स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाच्या टीमने २०वा क्रमांक मिळविला. यशस्वी कार स्टुडंट टीममध्ये अक्षय राजमाने, निखील कारेकर, रोहन शिंदे, ज्ञानेश दाते व अन्य सातजण गो कार्टचे विद्यार्थी सदस्य होते. निखील सनगर, सिमरनजीत सिंग, अनिकेत तांबे, मयूर राऊळ, गौरांग कदम, ओंकार कामटेकर, आदित्य पवार, दत्तप्रसाद पोकळे, मुसेब मोडक व अन्य यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
आमच्या विद्यार्थ्यांमध्येदेखील शहरी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक हुशारी आहे. हे विद्यार्थी नक्कीच उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहेत.
- डॉ. जी. व्ही. मुळगुंद,
प्राचार्य, राजेंद्र माने महाविद्यालय
आंबवसारख्या ठिकाणी शिकून या विद्यार्थ्यांनी कार बनवली आणि तीदेखील राष्ट्रीय स्पर्धेत क्रमांकप्राप्त ठरली, हे खरोखरच आमच्यासाठी गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
- रवींद्र माने,
संस्थाध्यक्ष, माने महाविद्यालय
1फॉर्म्युला रेसिंग स्पर्धेसाठी टीमचे नाव ‘एमएच - ०८ रेसिंग’ असे आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या गाडीची इंजिन क्षमता ६०० सीसी इंजिन असून, गाडी तासी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने पळते.
2गो कार्टिंग स्पर्धेसाठी टीमचे नाव ‘टीम फूल थ्रोटल’ असे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गाडीचे इंजिन महिंद्रा रोडिओ सीव्हीटी या श्रेणीतील १२५ सीसी क्षमतेचे आहे. गाडी तासी ८० किलोमीटर प्रतितास वेगाने पळते.
3एमएच-०८ रेसिंग टीमने बनवलेल्या स्टुडंट फॉर्मुला कार ० ते १०० मीटर अंतर ६ सेकंदात पार करु शकते.