‘गणेश इंडस्ट्रीज’मधील कामगारांचा प्रश्न पेटणार

By Admin | Updated: November 11, 2015 23:56 IST2015-11-11T20:40:25+5:302015-11-11T23:56:16+5:30

संदीप सावंत : आंदोलनाच्या मैदानात काँग्रेसची ‘एन्ट्री’

The question of the workers of 'Ganesh Industries' will be raised | ‘गणेश इंडस्ट्रीज’मधील कामगारांचा प्रश्न पेटणार

‘गणेश इंडस्ट्रीज’मधील कामगारांचा प्रश्न पेटणार

चिपळूण : गाणे - खडपोली येथील गणेश इंडस्ट्रीजच्या कामगारांना न्याय मिळत नसल्याने आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
गाणे - खडपोली येथील जे. के. फाईल्स कंपनीअंतर्गत गणेश इंडस्ट्रीज कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत स्थानिक कामगार काम करीत आहेत. अगदी ३४पासून २०० रुपये रोजंदारीवर कामगार काम करीत होते. या कामगारांना किमान वेतन मिळत नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कामगार कल्याण संघटनेला याची माहिती दिली. संघटना व कंपनी यांनी कामगारांना कोणतीही कल्पना न देता करार केला. करारानुसार कामगारांना प्रतिदिन ३१५ व ३२५ रुपये देण्याचे ठरले.
शिवाय मागील फरकही दिला जाणार होता. त्यामुळे कामगारांनी ते मान्य केले होते. परंतु, पुढील दोन महिन्यात त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कामगारांनी संघटनेकडे धाव घेतली. संघटनेने काम बंद आंदोलन करण्यास सांगितले. मात्र, कंपनीचे नुकसान होऊ नये म्हणून शीपनुसार काम सुरु ठेवत साखळी उपोषण सुरू केले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केला व काम बंद पाडले. तरीही कामगार ठरल्याप्रमाणे कामावर जात आहेत. काही दिवसांपूर्वी कामगार आयुक्त, व्यवस्थापनाचे प्रमुख, मालक व कामगार यांची बैठक झाली. त्यावेळी मागील फरक व करारानुसार वेतन देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आपल्याला जे. के. कंपनी माल देत नाही, असे सांगितले. २८ आॅक्टोबरपासून कामगारांनी कच्चा माल पूर्वीप्रमाणे द्यावा म्हणून जे. के. फाईल्स कंपनीविरोधात साखळी उपोषण सुरु केले. कामगारांनी जे. के.च्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून वस्तुस्थितीची माहिती दिली व माल देण्याचे मान्य केले. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
असे असताना कामगारांची पिळवणूक करण्याच्या उद्देशाने कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना ७ नोव्हेंबर रोजी पोस्टाद्वारे नोटीस पाठवून कारखाना चालविणे परवडत नसल्याचे कळवले आहे. गणेश इंडस्ट्रीज कंपनी चालू न केल्यास कामगारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या जुलमी प्रशासनाच्या विरोधात २१ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण बेमुदत उपोषण करू. यात माझे काही कमी जास्त झाल्यास जे. के. प्रशासन, तालाबोट प्रशासन तसेच गणेश इंडस्ट्रीजचे मालक व व्यवस्थापक यांना जबाबदार धरावे, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)


प्रश्न प्रलंबितच : रोजंदारी वाढलीच नाही
गेले अनेक दिवस गाणे-खडपोलीतील या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामगारांना ठरलेले वेतन तसेच मागील फरकही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कंपनीचे प्रशासन कामगारविरोधी आहे की काय? अशा प्रश्न काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.


काँग्रेस आक्रमक
गणेश इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या या प्रश्नावर काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.


गाणे - खडपोली येथील जे. के. फाईल्स कंपनीअंतर्गत गणेश इंडस्ट्रीज कंपनी कार्यरत.
३४पासून २०० रुपये रोजंदारीवर कामगार करत होते काम.
करारानुसार ३१५ ते ३२५ रुपये प्रतिदिन देण्याचे ठरले.
कराराची अंमलबजावणी रखडली.

Web Title: The question of the workers of 'Ganesh Industries' will be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.