कंपन्यांच्या सेफ्टी व स्ट्रक्चलर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:37+5:302021-03-22T04:28:37+5:30
आवाशी : दर दाेन वर्षांनी कंपनीतील सेफ्टी ऑडिट व दर पाच वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सुरक्षा विभागाला ...

कंपन्यांच्या सेफ्टी व स्ट्रक्चलर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर
आवाशी : दर दाेन वर्षांनी कंपनीतील सेफ्टी ऑडिट व दर पाच वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सुरक्षा विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, लाेटे औद्याेगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फाेटानंतर कंपन्यांचे सेफ्टी व स्ट्रक्चरल ऑडिट हाेते का, हा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
घरडा केमिकल्स कंपनीत शनिवारी झालेल्या स्फाेटात चाैघांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर बनली आहे. या अपघातानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच कंपन्यांचे सेफ्टी व स्ट्रक्चरल ऑडिट हाेते का, याची माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले हाेते. त्याचबराेबर कंपन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट हाेणे गरजेचे असल्याचे विधान त्यांनी केले हाेते. औद्याेगिक वसाहतीत घडणाऱ्या दुर्घटना पाहता अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीत १५ मार्च राेजी आग लागून तीन कामगार भाजल्याची घटना घडली हाेती. त्यामधील एकजण गंभीर असून, त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर शनिवारी घरडा केमिकल्स कंपनीत स्फाेट हाेऊन चार कामगारांना आपला जीव गमवावा लागला. कंपन्यांमध्ये घडणाऱ्या या घटनांमुळे कंपन्यांचे सेफ्टी व स्ट्रक्चलर ऑडिट हाेते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट दर दाेन वर्षांनी करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये रिॲक्टर वा अन्य यंत्रसामुग्रीची तपासणी दर वर्षांनी करायची असते.
त्याला ‘प्रेशर व्हेसल’ असे म्हटले जाते. त्याची अंतर्गत तपासणी दर सहा महिन्यांनी करायची असते. सेफ्टी ऑडिट व व्हेसल टेस्टिंग हे बाॅयलर इन्स्पेक्टर यांनी करून त्याचा अहवाल सुरक्षा विभागाकडे सादर करायचा असताे. मात्र, ही तपासणी प्रत्यक्ष बाॅयलर इन्स्पेक्टर करत नसून, त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या मान्यताप्राप्त कन्सलटन्सीद्वारे केली जात असल्याचे पुढे आले आहे, तर अनेक कंपन्या केवळ कागदाेपत्रीच या तपासण्या करून अहवाल सादर करत आहेत.
लाेटेतील अनेक कंपन्यांनी सेफ्टी व स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे की नाही, याची माहिती घेणे गरजेचे आहे. अनेक कंपन्यांकडे स्वत:कडे सांडपाणी साठवण्यासाठी ईटीपी प्लॅंट नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सेफ्टी व स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती घेणे गरजेचे बनले आहे.
चाैकट
स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे जेथे उत्पादन घेतले जाते, त्या इमारतीचे ऑडिट इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडून केले जाते. त्याचाही अहवाल सुरक्षा विभागाला दिला जाताे. सुरक्षा रक्षकाकडून हिरवा कंदील मिळाल्यास त्या इमारतीत उत्पादन घेणे धाेकादायक नसते. मात्र, सुरक्षा रक्षकाने काही दाेष दाखविल्यास कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत पुढील उत्पादन करता येत नाही.