दुग्धव्यवसाय वाढीसाठी जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मार्गी; पण...
By Admin | Updated: July 30, 2014 23:47 IST2014-07-30T23:44:31+5:302014-07-30T23:47:44+5:30
रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान

दुग्धव्यवसाय वाढीसाठी जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मार्गी; पण...
रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दुधाळ जनावरांच्या वाटपाबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सोडविण्यासाठी चाऱ्यांचे ठोंब वितरीत करण्यात येत आहेत. पण, असे असले तरीही दुग्ध व्यवसायाची फार मोठी प्रगती झालेली नाही.
वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था, बचत गट, मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. १ हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ३० हजार ते १ लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत.
यावर्षी जयवंत, यशवंत जातीचे गवताचे सुमारे ६ लाख ठोंबांचे वितरण करण्यात येणार आहे. पडिक जमिनीबरोबर शेताच्या बांधावर किंवा कलमांच्या बागेत आंतरपीक म्हणून चाऱ्याचे उत्पादन घेता येऊ शकेल. उत्पादित चारा गुरांसाठी ठेऊन अधिकचा चारा विकता येऊ शकेल. साडेतीन रूपये किलो दराने चारा विक्रीतून शेतकऱ्याला अर्थार्जन मिळू शकते.
तसेच निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून कमी खर्चात व उपलब्ध साहित्याचा वापर करून उत्कृष्ट चारा निर्मितीचे प्रात्यक्षिकांव्दारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या युरिया, मीठ, झारी, प्लास्टिक कापड, माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. अशिय सोपी, कमी खर्चिक, उपलब्धतेनुसार चारा निर्मिती करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जनावरांच्या मलमुत्रापासून पैदास होणाऱ्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उरलेला चारा, शेण, मूत्र योग्य प्रमाणात एकत्र करून सेंद्रिय खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी लागणारा डिंक पोजर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. एकूणच शेतकऱ्यांना शेती व दुग्धपालन व्यवसायाव्दारे अन्य छोटेमोठे जोडधंदे करून अर्थार्जन करणे सोपे होत आहे.
सध्या जिल्ह्यात एक लाख ९० हजार ५५६ मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध आहे. तसेच २२ हजार ७०४ मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस जुलैपर्यंत लांबला होता. परिणामी शेतकऱ्यांमध्ये गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या चारा मुबलक स्वरूपात उपलब्ध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)