स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे : ऊर्मिला चिखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:58+5:302021-09-11T04:31:58+5:30
दापाेली : आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनाच्या धर्तीवर स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. तसेच असंघटीत ...

स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे : ऊर्मिला चिखले
दापाेली : आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनाच्या धर्तीवर स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. तसेच असंघटीत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्याेजक, स्वयंसहायता गट, शेतकरी, उत्पादक, कंपनी तसेच सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी कार्यरत राहणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना ३५ टक्केपर्यंत अनुदान मिळेल, अशी माहिती आत्माच्या प्रकल्प उपसंचालक ऊर्मिला चिखले यांनी दिली.
शासनाच्या कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी दापाेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला संचालक डॉ. संजय भावे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक ऊर्मिला चिखले, तालुका कृषी अधिकारी प्रदीप थेटे, जिल्हा संसाधनचे अमर पाटील, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंदार खानाेलकर, ग्रामोदय शेतकरी उत्पादक कंपनीचे विनय महाजन उपस्थित होते.
डॉ. संजय भावे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी अन्नधन्याचे मूल्यवर्धन करावे. तसेच दापोली येथे विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत फळप्रक्रिया तसेच अन्नप्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात याचा शेतकऱ्यांनी फायदा करुन घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. मंदार खानविलकर यांनी कोकणातील दुर्लक्षित फळपीके ब त्यांचे फळप्रक्रियेतील महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सांगितले की, ग्राहकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता निर्माण झाली असून, त्यांना आरोग्यवर्धक, आकर्षक पॅकिंग केलेले पदार्थांना बाजारात मागणी आहे.
अमर पाटील यांनी सांगितले की, एक जिल्हा एक उत्पादनांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना आंबा प्रक्रियेमध्ये काम करावयाचे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांचे घरगुती स्वरुपात असंघटीत उद्याेग असतील तर त्यांना त्या उद्याेगाचे नुतनीकरण करणे, क्षमता वाढ करण्यासाठी या योजनेअंतगत शेतकरी अर्ज करु शकतात. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी सुभाष अबगुल यांनी केले. कृषी अधिकारी प्रदीप थेटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्यासह आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश कोरके यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी घरगुती प्रक्रियादार, उमेद अंतर्गत स्थापन करण्यात आलेले स्वयंसहाय्यता गटांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.