दापोली शहरात सेनेला धक्का
By Admin | Updated: October 23, 2014 00:04 IST2014-10-22T22:39:12+5:302014-10-23T00:04:12+5:30
भाजपला साथ : सत्ताधाऱ्यांना मतदारांनी डावलले

दापोली शहरात सेनेला धक्का
शिवाजी गोरे- दापोली -दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. नगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाला स्थान दिल्यास मुस्लिम व्होट बँक आपल्या बाजूने राहील, असा विश्वास सेनेला होता. मात्र, हा अंदाज चुकला असून, दापोली शहरात भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत. तसेच खेड - मंडणगड शहरानेसुद्धा सेनेला नाकारल्याने सेनेच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात चांगली मते घेऊनसुद्धा सेनेचे पाचवेळा विजय झालेले दळवी यांना पराभव पत्करावा लागला आहे.
दापोली नगरपंचायतीत अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक गळाला लागल्यानंतर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपद दिल्याचे भांडवल करुन मुस्लिम व्होट बँक दळवी यांच्या पाठीशी असल्याचा प्रचार केला जात होता. तालुक्यातील मुस्लिम समाजात मुस्लिम नगराध्यक्ष हाच प्रचाराचा मुद्दा केला जात होता. परंतु याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. भाजपचे उमेदवार केदार साठे यांना दापोली शहरातील मतदारांनी पहिल्या पसंतीची मते देऊन शिवसेनेला नाकारले. दापोली शहरात राष्ट्रवादीचे संजय कदम यांनासुद्धा चांगली मते मिळाली. कदम यांनी शहरात कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नव्हता. दोन वर्षात एकदाही दापोलीतील कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. शहरात पक्षाच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम घेतला नव्हता. येथील जनतेसाठी एखादी सभासुद्धा घेतली नाही तरीही जनतेने त्यांना चांगली मते दिली. संजय कदम यांनी प्रचार हा ग्रामीण भागावर केंद्रित केला होता. कदम हे खेडचे असल्याने त्यांना मतदार नाकारतील, हा समज मतदारांनी चुकीचा ठरवला.
खेड शहरात मनसेची सत्ता आहे. अपेक्षेप्रमाणे खेड शहरातील मतदारांनी मनसेला पहिल्या पसंतीची मते दिली. राष्ट्रवादीला दोन नंबरची मते मिळाली. खेड शहरात मनसेचे वैभव खेडेकर यांनी केलेले काम जनतेला ज्ञात आहे. खेड शहरात त्यांची सत्ता असल्याने त्यांना मतदारांनी चांगली पसंती दिली. खेड शहरात राष्ट्रवादीला कमी मते मिळाली. तरीही खेड तालुक्यातील ग्रामीण जनतेने संजय कदम यांना मताधिक्य दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला.
मंडणगड ग्रामपंचायतीवर सेनेची सत्ता आहे मंडणगडात सेनेला मताधिक्य मिळेल, असे वाटत होते. मात्र, मंडणगड शहरातील जनतेने राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना साथ देऊन सेनेपेक्षा अधिक मताधिक्य दिले. मंडणगड तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याने कदम यांच्या विजयात मंडणगड तालुक्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
कदम यांनी सभा घेतली नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी प्रचारासाठी तालुक्यात एकही सभा लावली नाही. भास्कर जाधव यांनी एक दिवस दापोली-मंडणगड तालुक्यात धावती सभा घेतली. तीनही शहरात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नाही. कदम यांच्या प्रचारासाठी एकही स्टार प्रचारक दापोलीत आला नव्हता. निवडणुकीदरम्यान केवळ ग्रामीण कार्यकर्त्यांची फौज घेऊन ते एकटेच प्रचार करत होते. राष्ट्रवादीत बंडखोरी होऊनसुद्धा ते विजय झाले. त्याउलट सेनेचे दळवी यांच्यासाठी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी सभा घेतली होती. सेनेचा प्रचार जोमाने सुरु होता.