विरोधी काम करणाऱ्यांना दे धक्का

By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T23:01:04+5:302015-10-01T00:28:36+5:30

एस. टी. महामंडळ : मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे स्पष्टीकरण

Push to give anti-workers | विरोधी काम करणाऱ्यांना दे धक्का

विरोधी काम करणाऱ्यांना दे धक्का

रत्नागिरी : महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी बरखास्त केली नसून, संघटनाविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर केले आहे. रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवली असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या रत्नागिरी विभागाने केला आहे.
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी रद्द करुन नवीन कार्यकारिणी नियुक्त केली. मात्र, हा प्रकार हुकूमशाही पद्धतीचा असून, रद्द करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आगार सचिव सचिन वायंगणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
सचिन वायंगणकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना रत्नागिरी आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे संघटनेच्या कोणत्याही मिटिंगला उपस्थित राहात नव्हते. संघटनेच्या खेड येथील वार्षिक मेळाव्यास तसेच १२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रादेशिक मेळाव्याला आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार उपस्थित राहिले नाहीत. संघटनेच्या वेळोवेळी होणाऱ्या सभेला आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार उपस्थित राहात नाहीत. तसेच विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिवांच्या आदेशाचे पालन करीत नसल्यामुळे व आगारातील संघटनेच्या सभासदांच्या तक्रारी व मागण्यांचे आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार दुर्लक्ष करीत असल्यामुळे रत्नागिरी आगारातील बहुसंख्य सभासद वारंवार संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीकडे तक्रार करीत असल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आगारातील संघटनेच्या सभासदांच्या मागण्यांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व फक्त आगाराचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार स्वार्थ बघत असल्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी २४ सप्टेंबरच्या विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार या फक्त तीन पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उर्वरित कार्यकारिणी पूर्वीप्रमाणेच कायम आहे. आगाराची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली नाही. फक्त आगाराचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार हे पदाधिकारी बदलले असल्याचे विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांनी सभेमध्ये जाहीर केले.
रत्नागिरी विभागाच्या सचिवांनी सचिव पदाचा राजीनामा विभागीय अध्यक्षांकडे दिला होता. विभागीय कार्यकारिणीने तो राजीनामा मंजूर केल्याने अ‍ॅडव्हॉक समिती नेमली व त्यात विभागीय सचिवपदी रवींद्र लवेकर व कार्याध्यक्षपदी दत्ताराम घडशी यांची निवड केली. त्याला राज्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे, असे रत्नागिरी विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Push to give anti-workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.