रस्सीखेच स्पर्धेत पंजाब संघाचे वर्चस्व
By Admin | Updated: February 4, 2015 23:58 IST2015-02-04T23:41:24+5:302015-02-04T23:58:11+5:30
वेंगुर्ल्यात आयोजन : मिझोराम द्वितीय, हरियाणाला तृतीय क्रमांक

रस्सीखेच स्पर्धेत पंजाब संघाचे वर्चस्व
वेंगुर्ले : टग आॅफ वॉर फेडरेशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टग आॅफ वॉर असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघ आयोजित देशातील आठव्या मैदानी टग आॅफ वॉर नॅशनल चॅम्पियनशिप ६४० व ४८० किलो वजनी गटात पुरुष व महिलांमध्ये पंजाबने विजेतेपद पटकाविले. बीच व मैदानी प्रकारातही पंजाबचे वर्चस्व राहिले.
वेंगुर्ले कॅम्प पॅव्हेलियन मैदान येथे आठव्या टग आॅफ वॉर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा गेले दोन दिवस सुरू आहे. चौदा राज्यांतील सुमारे ४०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ६४० किलो वजनी गटात पंजाबविरुद्ध आसाम यांच्यातील सामन्यात ३- ० ने पंजाब संघ विजयी झाला. पंजाब विरुद्ध मिझोराम यांच्यातील सामन्यात ३-० अशी लढत होत पंजाब विजयी ठरला. तिसऱ्या फेरीत आसाम विरुद्ध हरियाणा यांच्यात झालेल्या सामन्यात ३-०ने हरियाणा विजेता ठरला. त्यामुळे पंजाब प्रथम, मिझोराम द्वितीय व हरियाणा तृतीय विजेते ठरले.
४८० किलो वजनी गटात पंजाब विरुद्ध हरियाणा यांच्यात ३-०ने पंजाब संघ विजेता ठरला. दुसऱ्या सामन्यात आसामविरुद्ध मणिपूर यांच्यात ३-० अशी लढत होऊन आसाम संघ विजेता ठरला. पंजाब विरुद्ध आसाम यांच्यात ३- ० ने लढत होत पंजाब प्रथम, आसाम द्वितीय व मणिपूर तृतीय विजेते ठरले. स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेकरिता पंच म्हणून एन. के. चक्रवर्ती, परमजित शर्मा, किसनसिंग चाहल, गौरव सैनी, गौरव दीक्षित, राहुल वाघमारे, आनंद जोंधळे यांनी काम पाहिले.